कुंभारमाठ देऊळवाडा येथील उतारावरील एका धोकादायक वळणावर
मालवण,दि.५ फेब्रुवारी
कुंभारमाठ येथून भरधाव वेगाने मालवणच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटारसायकल स्वाराने समोरून आलेल्या अर्टिगा कारला दिलेल्या जोरदार धडकेमुळे मोटारसायकल स्वार संजीवकुमार मोहनराय यादव (वय-२०) राहणार बिहार या लादी कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीच्या मागे बसलेला त्याचा सहकारी मुन्नीकुमार राम हा गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी मुन्नीकुमार याला मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हा अपघात आज सोमवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास कुंभारमाठ देऊळवाडा येथील उतारावरील एका धोकादायक वळणावर घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालवण कुंभारमाठ येथे राहणारा संजीवकुमार मोहनराय यादव हा तरुण आपल्या ताब्यातील मोटारसायकल वरून आपला सहकारी मुन्नीकुमार राम याला घेऊन मालवणच्या दिशेने जात असताना या मोटरसायकलने समोरून येणाऱ्या नांदेडच्या पर्यटकांच्या अर्टिगा गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत मोटारसायकल स्वार संजीवकुमार यादव याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेला मुन्नीकुमार राम हा गंभीररित्या जखमी झाला त्याला मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात मुन्नीकुमार राम याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, जिल्हा वाहतूक शाखेचे दीपक तारी, महेंद्र देऊलकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर, विलास टेंबुलकर, सुशांत पवार, गुरुप्रसाद परब, राजन पाटील, महादेव घागरे यांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची माहिती घेतली. या अपघात प्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही रात्रौ उशिरापर्यंत सुरू होती.