गृहमंत्रालयाच्या नियोजन शून्य कारभारामुळे पोलिसांच्या निवासस्थानाबाबत हेळसांड

सावंतवाडी,दि.१८ डिसेंबर
पोलिस ठाणे आणि जवळपास पोलिसांची घरे असतील तर कारभार अतिशय सुरळीत चालतो असे म्हटले जाते. त्याच धर्तीवर सावंतवाडी पोलीस ठाणे आणि पोलिसांची ८९ घरे जवळपास होती. मात्र गेल्या काही वर्षापासून पोलिसांच्या घरांकडे लक्षच दिला नसल्याने घरे कोसळत आहेत. तर काही झाडी झुडपानी वेढलेली तसेच या घरांची जागाही अपुरी पडत असल्याने बहुतेक पोलिस भाड्याने किंवा मालकीच्या फ्लॅट मध्ये रहात आहेत. सध्या १४ घरात पोलिस राहतात.
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात जवळपास आठ ते दहा एकर जमीन आहे. या क्षेत्रात पोलिस ठाणे,घरे आदी आहे. पण गृहमंत्रालयाच्या नियोजन शून्य कारभारामुळे पोलिसांच्या निवासस्थानाबाबत हेळसांड होत आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात ८९ रूम पोलिसांसाठी होते. अनेक रूमची पडझड झाली आहे.तर अनेक रूम नादुरुस्त झाल्याने तेथे कोणीही राहत नाही. सध्या १४
रूम मध्ये पोलिस राहतात. तेथेही हेळसांड होत आहे. पोलिस २४ तास,४८ तास ड्युटीवर असताना कुटुंबीयांना सुरक्षित वातावरणात राहायला मिळाले पाहिजे. पण सावंतवाडी पोलीस वसाहत मध्ये तसे वातावरण आहे का? हे वरिष्ठांनी डोकावून कधी पाहिले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातो.


सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात ८९ रूम,घरे आहेत. बहुतेक देखभाली अभावी कोसळली आहेत. आता याठिकाणी १४ रुम, घरात पोलिस निवास करत आहेत. सध्या पोलीस ठाण्यात ६२ नेमणुका आहेत. त्यामुळे अनेकजण भाड्याच्या खोलीत जाऊन राहतात. तर इतरांनी फ्लॅट किंवा घर खरेदी केली आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहत नाहीत. याठिकाणी पोलिसांची हक्काची जागा आहे. पण पोलिसांसाठी घरं नाहीत अशी शोकांतिका निर्माण झाली आहे.
पोलिस ठाण्यातील आवारात पोलिस अधीक्षक यांनी जरा फेरफटका मारायला हवा. आपले कर्मचारी कर्तव्य बजावताना त्यांचे कुटुंबीय कसे राहतात हे पहायला हवे. पुर्वी पोलिस ठाण्याच्या आवारातील घरे उपलब्ध असल्याने पोलिस तेथे राहत आणि एखाद्या प्रसंगात तात्काळ पोलिस ठाण्यात हजर होत होते.
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिस उपविभागीय कार्यालय व पोलीस ठाणे आहे. तेथे पोलिस उपविभागीय अधिकारी यांना निवासस्थान नाही तर पोलिस निरीक्षक यांना निवासस्थान आहे,पण ते जुन्या पध्दतीचे आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्वंच तेथे राहायला कुरकुर करत असतात. पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसांना घरे मिळाली तर पोलिसांचे पथक जलदगतीने धावपळ करू शकते.
सावंतवाडी पोलीस निरीक्षक, पोलिस उपविभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घरे किंवा फ्लॅट पोलिस ठाण्याच्या आवारातील जागेवर उपलब्ध झाले तर निश्चितपणे मुक्काम करणारे कुटुंबीय बिंधास्त असतील.