मालवणात गृहमंत्री अमित शहा यांचा काँग्रेसकडून निषेध व्यक्त

मालवण,दि.१८ डिसेंबर

संसदेत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेले वक्तव्य हे अससंदिय असून गृहमंत्री पदाला शोभणारे नसल्याची टीका करत आज मालवणात राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे मास्क लावून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन अमित शहा यांचा निषेध व्यक्त केला. तसेच याबाबत अमित शहा यांनी माफी मागावी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.

संसदेत हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर, आंबेडकर हे नाव घेण्याची फॅशन झाली असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्याचा राष्ट्रीय काँग्रेस कडून निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मालवण बस स्थानक परिसरात राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे मास्क लावून तसेच अमित शहा यांच्या निषेधाचे फलक झळकावत शहा यांचा निषेध केला. गृहमंत्री पदावर असलेल्या अमित शहा यांनी एखाद्या महान व्यक्ती वरून अथवा देवदेवता धर्म यांवरून संसदेत बोलणे योग्य नाही, असे यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यावेळी अमित शहा येतील त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील. शहा यांच्या वक्तव्यामुळे जनभावना दुखावल्या असून नाराजी व्यक्त होत आहे, त्यामुळे पंतप्रधानानी शहा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, युवक माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, युवक तालुकाध्यक्ष श्रेयस माणगावकर, मधुकर लुडबे, सरदार ताजर, लक्ष्मीकांत परुळेकर, बाबा मेंडीस, दीपाली परब व इतर पदाधिकारी उपस्थित होते