आई झोपलीस का? विचारायला मान मागे वळविली आणि गाडी कालव्यात पडली पहाटे तीनच्या सुमारास घटना
कोल्हापूर येथून घरी परतताना अपघात
दोडामार्ग, दि. १९ डिसेंबर
अंगात धडकी भरवणारी थंडी पहाटेची वेळ अनेक जण साखर झोपेत सर्व शांतता राञ किड्यांचा आवाज याच दरम्यान गुरुवारी पहाटे साटेली भेडशी भोमवाडी येथे तिलारीच्या उजव्या कालव्यात स्काॅर्पिओ चालकाने आई झोपलीस का? म्हणून जरा मान मागे वळविली आणि क्षणात लक्ष विचलित होऊन स्काॅर्पिओ गाडी थेट कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात शुभांगी शिवा परब, वय वर्षे ६२ यांचा मृत्यू झाला. या घटनेने वझरी पेडणे गोवा तसेच कुडासे वानोशी गावात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात तिचा मुलगा किरकोळ जखमी झाला. तीन किलोमीटर अंतरावर घर असताना काळाने डाव साधला. घटनास्थळी दोडामार्ग पोलिसांनी पंचनामा केला.
मुख्य मार्गावर तिलारी कालवे गेले आहेत या ठिकाणी संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडत आहेत. असा आरोप केला जात आहे.
दोडामार्ग तालुक्यातील कुडासे वानोशी येथे माहेर असलेल्या वझरी पेडणे गोवा येथे सासर असलेल्या सौ. शुभांगी शिवा परब या आपला मुलगा सचिन परब याला सोबत घेऊन तिचे पती कोल्हापूर येथे दवाखान्यात आहेत. त्याना डिसचार्ज देणार म्हणून भाऊ दत्ता तळणकर यांची स्काॅर्पिओ गाडी एम. एच. ०७ ए. जी. ६९५१ घेऊन बुधवारी सकाळी कोल्हापूर येथे गेले होते. पण डिसचार्ज मिळाली नाही म्हणून ते रात्री उशिरा कोल्हापूर येथून घरी येण्यासाठी रात्री उशिरा आई मुलगा निघाला.
रात्री कुडासे वानोशी येथे भावाच्या घरी आराम करून सकाळी नंतर वझरी पेडणे गोवा येथे जाण्याचा बेत होता. कोल्हापूर प्रवास करून ही स्काॅर्पिओ गाडी वानोशी कुडासे रस्त्यावर वळवली आणखी पंधरा मिनिटात ते घरी पोहोचणार होते. जवळपास पाऊणे दोनशे किलोमीटर प्रवास यामुळे स्काॅर्पिओ गाडी चालवणारा मुलगा सचिन परब याने आई काय बोलत नाही म्हणून सहज मान मागे वळविली आणि आई झोपलीस का अशी विचारणा केली. आणि एवढ्यात तिलारी उजव्या कालव्यात स्काॅर्पिओ गाडी कधी पडली हे कळलेच नाही.