अखेर निगुडे नळ योजना सुरळीत – गुरुदास गवंडे यांनी वेधले गटविकास अधिकार्‍यांचे लक्ष

बांदा,दि.१९ डिसेंबर
निगुडे माजी उपसरपंच गुरदास गवंडे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला इशारा दिल्यानंतर नळ योजनेची पाईपलाईन तत्काळ दुरुस्त करण्यात आली. यासंदर्भात गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांचे लक्ष वेधण्यात आले होते.
गेले अनेक दिवस निगुडे गावातील नळ योजनेची पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटून पाण्याची नासाडी होत होती. माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी याकडे गटविकास अधिकार्‍यांचे लक्ष वेधले. त्यांनी तत्काळ ग्रामसेवक यांना सूचना देऊन सदर काम लवकरात लवकर पूर्ण करा असे आदेश दिले. त्या अनुषंगाने बुधवारी उशिरापर्यंत दोन ठिकाणी फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली. तसेच निगुडे तेलवाडी या ठिकाणी एअर वॉल बसवण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
नळ योजनेची वाढीव केलेली युनिट दरवाढ तसेच ग्रामसभेमध्ये ठराव विरोधात केलेल्या कामाची चौकशी करण्यासंदर्भात गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्याकडे गुरुदास गवंडे यांनी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामसभेत लोकांनी उठवलेल्या प्रश्नाबाबत अंमलबजावणी केली नाही तर यापुढेही जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.