वेंगुर्ले,दि.१९ डिसेंबर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार हे दीर्घकालीन दूरदृष्टी, अष्टपैलू नेतृत्व, आणि सर्वसमावेशक कार्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या, तसेच देशाच्या राजकारणात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी उचललेली पावले आजही समाजासाठी दीपस्तंभ ठरत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देऊन त्यांनी महिलांसाठी समान संधी निर्माण केली. महिलांवरील अन्याय आणि अत्याचार थांबवण्यासाठी महिला आयोग स्थापन करत न्याय मिळवून देण्याचा मजबूत आधार दिला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट बनवण्याचा मार्ग प्रशस्त केला, ज्यामुळे असंख्य महिलांचे आयुष्य उजळले. अशा नेत्याचा आदर व सन्मान देशात होत असतो. त्यांच्या नेतृत्वाखाली कृषी, शिक्षण, आरोग्य, आणि औद्योगिक क्षेत्रात झालेले अभूतपूर्व योगदान अविस्मरणीय आहे. एका संवेदनशील व प्रगल्भ नेत्याच्या रूपात त्यांनी केवळ समाजासाठी नव्हे, तर प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक ठरणारी भूमिका निभावली आहे. असे प्रतिपादन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. नम्रता कुबल यांनी वेंगुर्लेत केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले तालुका शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वेंगुर्ले शहरातील जि.प.राणी लक्ष्मीबाई शाळा, वेंगुर्ले तालुका स्कूल नं.1 व वेंगुर्ले शाळा नं. 4 अशा तीन प्राथमिक शाळात खाऊ वाटप व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ नम्रता कुबल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरात जिल्हा सदस्य नितीन कुबल, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजीव लिंगवत, प्रभारी वेंगुर्ले तालुका अध्यक्ष बबन पडवळ, वेंगुर्ले शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, शहर सचिव स्वप्निल रावळ, महिला शहर अध्यक्ष अपूर्वा परब या प्रमुख पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. संजीव लिंगवत यांनी ही शरद पवार यांचे दूरदृष्टीने केलेले काम हे सर्व स्तरावरील जनतेला दिसून आलेले आहे असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभाराचे काम वेंगुर्ले शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी केले. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होता.