मनसे मालवण शहराध्यक्ष सागर जाधव यांचा आरोप
मालवण,दि.२० डिसेंबर
अवैध वाळू भरून भरधाव वेगाने गोव्याच्या दिशेने जाणारा डंपर कोळंब येथे पलटी होऊन अपघात झाला. कोणालाही न जुमानता राजरोसपणे वाळूची अवैध पद्धतीने आणि भरधाव वेगाने रात्रीच्या वेळी वाहतूक सुरु असून महसूल विभागाकडून केवळ दिखाव्यासाठी एखादी कारवाई करून “मी मारल्यासारखं आणि तू रडल्यासारखं कर” असे प्रकार केले जात आहेत. या अवैध वाळू वाहतुकीला महसूल प्रशासनच पूर्णपणे “सपोर्ट” करीत असतो, असा आरोप मनसेचे मालवण शहराध्यक्ष श्री सागर जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे करत लवकरच या सर्व प्रकाराबाबत महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
आज गेली ५ वर्षाहून अधिक काळ अधिकृत वाळू उपसा बंद आहे. तरीही कोट्यावधी रुपयांचा शासनाचा महसून बुडवून त्या बदल्यात अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून अवैधरित्या वाळू काढून त्याची वाहतूक केली जात आहे. यात अगदी खालपासून वरपर्यंत मलिदा पोच झाला की महसूल प्रशासन पूर्णपणे डोळेझाक करण्याचे काम करते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असा आरोपही सागर जाधव यांनी केला आहे.
तसेच अशा भरधाव वेगात चालणाऱ्या डंपरमुळे याआधी अनेक अपघात झाले आहेत. आणि यात निष्पाप लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. याबद्दल कोणीच काही बोलत नाही. तरी हे अवैध वाळू वाहतुकीचे प्रकार प्रशासनाने वेळीच थांबवावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रकार कसे थांबवावेत हे नक्कीच जाणते, असा इशाराही सागर जाधव यांनी दिला आहे. लवकरच या प्रकाराबद्दल आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तालुक्यातील तहसीलदार, मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांच्या चौकशीची मागणी करणार आहोत,असेही सागर जाधव यांनी म्हटले आहे.