गळ्यात काळ्या फिती बांधून घोषणाबाजी; अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
कणकवली,दि.२० डिसेंबर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुदगार काढून महामानवाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ कणकवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ठाकरे शिवसेनेकडून निदर्शने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अमित शाहांचा निषेध असो, राजीनामा द्या राजीनामा द्या अमित शाह राजीनामा द्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही एक चळवळ आहे संपूर्ण देशाचं दैवत आहे अशा घोषणा देण्यात आल्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने महामानवाचा अपमान केल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेकडून कणकवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे गळ्यात काळ्या फिती बांधून जोरदार घोषाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, संजय कदम, शिवसेना महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत पालव, महिला तालुकाप्रमुख वैदही गुडेकर, संजना कोलते, हेलन कांबळे, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, योगेश मुंज, प्रदीप सावंत, राजू राठोड, अजित काणेकर, तात्या निकम, बाबू केणी, जितेंद्र कांबळे, धनश्री मेस्त्री , माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर यांच्यासह कार्यकर्ते सामील झाले होते.
यावेळी निषेध व्यक्त करताना ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत म्हणाले, भाजपचे गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे ही फॅशन आहे. डॉ. आंबेडकर यांचे नाव घेण्यापेक्षा देवाचे नाव घेतला तर स्वर्गाची दार उघडतील असे वक्तव्य केले होते. खरंतर अमित शहा यांनी देवाचे आभार मानण्यापेक्षा डॉ. बाबासाहेबांचे आभार मानले पाहिजेत. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे अमित शहा हे तडीपार असूनही त्यांना आज गृहमंत्री पदावर विराजमान होण्याचे संधी मिळाली आहे. घटना बदल करण्याचे भाजपचे स्वप्न भंग पावले असल्याने त्यांची जळफळाट होत आहे. त्यामुळेच जे त्यांच्या पोटात आहे ते त्यांनी संसदेत बोलून दाखवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज लोकशाही जीवंत आहे. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याला भाजप पक्षाचे प्रमुख तसेच पंतप्रधान समर्थन करत आहेत त्यांचाही आम्ही निषेध करतो असे श्री. सावंत यांनी सांगितले. तसेच अमित शहा यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल थोडी जरी आस्था असेल तर त्यांनी राजीनामा देऊन त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करावे असे आवाहन सतीश सावंत यांनी केले.
यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव म्हणाल्या , ज्या संविधानामुळे आज आपण स्वर्गात असल्यासारखे वागत आहोत याचा विसर भाजपाला पडला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलताना भाजपने तारतम्य बाळगावे असे त्या म्हणाल्या.
शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर म्हणाले , बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलताना भाजपाच्या नेत्यांची जीभ घसरत आहे. संविधानाचा विसर भाजपाला पडला आहे असे ते म्हणाले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप कदम म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार दिले त्याची जाणीव भाजपच्या नेत्यांना नाही म्हणूनच घटना बदलासाठी त्यांना पूर्ण बहुमत हवे होते ते मिळाले नसल्याने त्यांचा संयम ढासळत असल्याचे संदीप कदम यांनी सांगितले.