कणकवलीत प्लास्टिक पिशवी,वस्तू वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

१८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल ; ५० मायक्राँनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक मोहिमेंतर्गत कारवाई

कणकवली दि.२० डिसेंबर

कणकवली नगरपंचायत हद्दीमध्ये एकल वापर प्लास्टिक वापर करणाऱ्या रस्त्यावरील विक्रेते,फुल विक्रेते,स्थानिक बाजारपेठ,भाजीपाला विक्रेते आणि दुकाने यांच्यावर नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाद्वारे कारवाई करण्यात आली.या मोहिमेंतर्गत ५० मायक्राँनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवी,वस्तू वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून एकूण १८ किलो प्लास्टिक जप्त करून १८ हजार २०० रुपये रकमेचा दंड वसूल करण्यात आला.

एकल वापर,प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दर महिन्याला अंमलबजावणी करण्यासाठी मोहीम राबिवण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. या अनुषंगाने मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवलीत कारवाई करण्यात आली. ही कारवाई कणकवली नगरपंचायत पाणी पुरवठा व मलनिसारण अभियंता सोनाली खैरे,स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, ध्वजा उचले, आरोग्य लिपिक सतीश कांबळे,शहर समन्वयक वर्षा कांबळे , कणकवली नगरपंचायत कर्मचारी राजेश राणे, रवींद्र म्हाडेश्वर,सुजल मुणगेकर, संदेश तांबे व इतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी केली.

व्यापारी व नागरिकांनी ५० मायक्राँनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्याचा वापर टाळावा व कागदी किंवा कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले.