वेंगुर्ला,दि.२१ डिसेंबर
परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व संविधानाची झालेली विटंबना ही घटना क्लेशदायक आहे. अशा घटनांचा समाजमनावर वितरित परिणाम होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांनी लिहिलेल्या संविधानावरच आपल्या देशाचा कारभार चालतो. त्यामुळे संविधानाप्रती आदर बाळगणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. संविधानाची विटंबना करणा-या समाजकंटकांना कोणत्याही परिस्थितीत माफ करू नका. जे फरार आहेत त्यांचा शोध घेऊन संविधानाचा अनादर करणाया शक्तींना वेळीच पायबंद घाला, अशी मागणी फुले शाहू आंबेडकर विचारमंचातर्फे सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मंचातर्फे वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयात देण्यात आले.
तहसीलदार अनुपस्थित असल्यामुळे महसूल अधिकारी लक्ष्मण गावडे यांच्याडे हे निवेदन देण्यात आले. फुले शाहू आंबेडकर विचारमंचे अध्यक्ष जयपकाश चमणकर, सचिव महेंद्र मातोंडकर, सहसचिव लाडू जाधव, खजिनदार के.जी.गावडे, सदस्य प्रा.वसंत नंदगिरीकर, रामचंद्र जाधव, वाय. जी. कदम, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, होमगार्डचे तालुका समादेशक संतोष मातोंडकर व निवृत्त शिक्षक अरूण होडावडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
१० डिसेंबर रोजी परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील संविधान प्रतीची काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक विटंबना केली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले असून हा भारतीय राज्यघटनेचाच अवमान आहे. या घटनेतील संशयिताला लोकांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केले असले तरी अजूनही या प्रकरणातील तीन ते चार समाजकंटक फरार आहेत. संविधान व पुतळ्याची नासधूस करणारा सदर व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे भासविण्यात येत असले तरी या घटनेमागे मोठे कारस्थान शिजलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपला देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेवर चालत असून संविधानाचा अवमान हा देशाचा अवमान आहे. त्यामुळे परभणी जिल्हयात घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय आहे. सदर समाजकंटकांनी असे कृत्य नेमके का आणि कशासाठी केले याचा शोध घेऊन दृष्ट भावनेने केलेल्या या कृतीविरोधात शासनाने कडक पावले उचलून दोषींवर सक्त कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना पायबंद बसेल, संविधनाची विटंबना सरकारने कोणत्याही परिस्थितीत खपवून घेऊ नये. या प्रकरणातील फरार समाजकंटकांचा तात्काळ शोध घ्यावा. अशा घटनांमागे असलेल्या विघातक शक्तींचाही शोध घेण्यात यावा. देशात बंधूता आणि एकात्मकता अबाधित ठेवणा-या संविधानची विटंबना करणा-या समाजकटंकांचा आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारमंचातर्फे तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहोत, असे या निवेदनात म्हटले आहे.