नांदगाव – तोंडवली येथे दुर्मिळ खवले मांजर आढळले

कणकवली,दि.२१ डिसेंबर
कणकवली तालुक्यातील नांदगाव – तोंडवली येथे खवले मांजराची कुत्रे पाठलाग करताना शुक्रवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास प्रभाकर चिके यांना निदर्शनास आले . त्या खवले मांजराला सुरक्षितपणे कुत्र्यांपासून बचाव करत वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नांदगाव तोंडवली येथील प्रभाकर चिके यांचे घराजवळ रात्री 11.30 सुमारास त्यांना बाजूलाच काही रानटी कुत्रे पाठलाग करताना आवाज येत होता. त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने जात पाहीले असता खवले मांजर दृष्टीस पडले . कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी बाजुला असलेल्या वरद कुडतरकर यांच्या मदतीने त्या खवले मांजराला सुरक्षित ताब्यात घेतले. कुत्र्यांपासून बचाव करुन तात्काळ नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर व सर्प मित्र पंढरी वायंगणकर यांच्याशी संपर्क साधला.

त्यानंतर पंढरी वायंगणकर यांनी तातडीने फोंडाघाट येथील वनविभागाचे श्री. खोत यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यावेळी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, वनक्षेत्रपाल कणकवली राजेंद्र घुनकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल फोंडाघाट धुळू कोळेकर यांनी ताब्यात घेऊन त्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करण्यात आली आहे. खवले मांजर जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असून समाजात असलेल्या गैरसमजामुळे दुर्मिळ होत चाललेली वन्य जीवांची प्रजात आहे. खवले मांजर वन्यजीव अधिनियम 1972 मधील शेड्युल एक मध्ये असून त्याला डिवचने , पकडणे त्याची शिकार करणे हा गुन्हा आहे असे , विनविभागाच्या अधिका-यांनी सांगतले.
यावेळी वनपाल फोंडाघाट चे धुळू कोळेकर , तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, पोलीस पाटील विजय मोरये,पंढरी वायंगणकर, प्रभाकर चिके, सर्पमित्र बंटी पाटील,रिद्धेश तेली , ग्रामस्थ तुषार मेस्त्री,प्रविण मोरये श्रीकांत टाकळे आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत वनपाल फोंडाघाट धुळू कोळेकर यांच्याकडे खवले मांजराला सुरक्षितपणे ताब्यात देण्यात आले आहे.