कणकवली दि.२१ डिसेंबर
कणकवली विद्यामंदीर हायस्कूलचा विद्यार्थी पुष्कराज मंगेश साळसकर (वय 14 वर्षे) रा. साकेडी हा सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास पटकीदेवी येथील गल्लीतून हायस्कूल जवळ जात असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यात पुष्कराज या विद्यार्थ्याच्या पायाला भटक्या कुत्र्यांने चावा घेतला. यात पायाला गंभीर दुखापत झाली असून शाळेची पॅन्ट देखील त्या कुत्र्याने फाडून टाकली आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पुष्कराज साळसकर या विद्यार्थ्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान , कणकवली शहरात सर्वसामान्य नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. छोट्या मुलांसह विविध ठिकाणी कुत्र्यांचे हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे कणकवली नगरपंचायतने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी उपाययोजना करावी , अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.