सावंतवाडी- उपवडे ही बस नियमित वेळेत न सोडल्यास माणगाव खोऱ्यातील ग्रामस्थांच्यावतीने येत्या १५ दिवसांत आंदोलन छेडण्यात येईल

सावंतवाडी,दि.२१ डिसेंबर

सावंतवाडी वेंगुर्ले बसस्थानकावरून दररोज सायंकाळी ६.५० वा. सुटणारी सावंतवाडी- उपवडे ही बस नियमित वेळेत सुटत नसल्याने माणगाव खोऱ्यातील प्रवाशांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही सावंतवाडी वाहतूक नियंत्रकांकडून याबाबत उद्धट तसेच अर्वाच्य भाषेत उत्तरे दिली जात आहेत. त्यांच्या या अंधाधुंदी कारभारामुळे ग्रामस्थ अक्षरशः वैतागले आहेत. ही बस नियमित वेळेत न सोडल्यास माणगाव खोऱ्यातील ग्रामस्थांच्यावतीने येत्या १५ दिवसांत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप ओबीसी सरचिटणीस दीपक काणेकर, माणगावचे माजी उपसरपंच सचिन परब, शिवसेना युवा तालुका प्रमुख प्रसाद नार्वेकर यांनी सर्व प्रवाशांच्यावतीने दिला आहे.

सावंतवाडी-उपवडे ही एसटी बस सावंतवाडी – वेंगुर्ले स्थानकावरून सायंकाळी ६.५० वा. सोडली जाते. यापूर्वी या बसचा वेळ ६.३० वा. होता. परंतु आता ही वेळ एसटी नियंत्रकांनी जाणूनबुजून वाढवलेली आहे. परंतु या बसमधून प्रवास करणारा प्रवासी घरी वेळेत जाईल याची शाश्वती देता येत नाही. शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, सावंतवाडीत नोकरीला असलेले ग्रामस्थ हे उपवडेसारख्या ग्रामीण भागातून दररोज ये-जा करीत असतात. उपवडे बसथांब्यापासून बसमधून उतरल्यावर या प्रवाशांना दररोज किमान ३-४ किलोमीटर पायी प्रवास दुर्गम भागातून करून आपले घर गाठावे लागते. यामध्ये शालेय विद्यार्थी, महिला, वयोवृद्धांचाही समावेश असतो. त्यांना आपल्या घरी पोहोचेपर्यंत किमान रात्रीचे १०-१०.३० वाजतात. प्रवाशांच्या सेवेसाठीचे ब्रीद असणाऱ्या एसटी महामंडळाकडून उलट प्रवाशांना हा त्रास दिला जात आहे.
गेले वर्षभर ही एसटी बस कधीच वेळेत सुटली नाही. दररोज काही ना काही कारणावरून या बसला उशीर होतोच. याबाबत सावंतवाडी एसटी नियंत्रकांकडे विचारपूस केली असता सामान्य लोकांना उद्धट, अर्वाच्य भाषेत उत्तरे दिली जातात. कामावरून अथवा कॉलेजमधून सुटणारे प्रवासी या बसस्थानकावर दोन ते तीन तास एसटीच्या प्रतीक्षेत बसून असतात. या बसमधून अनेक महिला प्रवासीही प्रवास करीत असतात. त्यांना मानसिक तसेच शारीरिक नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दररोजच्या या उशिरा सुटणाऱ्या बसमुळे माणगाव खोऱ्यातील ग्रामस्थ वैतागले आहेत. याबाबत येत्या १५ दिवसांत सावंतवाडी-उपवडे एसटी वेळेत न सुटल्यास आपण आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन शनिवारी सावंतवाडी एसटी आगार सहाय्यक वाहतूक अधीक्षक राजाराम लवू राऊळ
यांना भाजप ओबीसी सरचिटणीस दीपक काणेकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे. या निवेदनावर भाजप ओबीसी सरचिटणीस दीपक काणेकर, माणगावचे माजी उपसरपंच सचिन परब, शिवसेना युवा तालुका प्रमुख प्रसाद नार्वेकर, अरविंद उर्फ हरी परब, खेमा सावंत आदींसह एकूण २६ जणांच्या सह्या आहेत. सावंतवाडी बसस्थानकावरून सायंकाळी ६.५० सुटणारी सावंतवाडी-उपवडे बस दररोज उशिराच सुटते. ही बस केव्हा रात्री ८.३० वा. तर केव्हा ९ वाजता बसस्थानकावरून सुटते. याबाबत एसटी नियंत्रकांशी विचारपूस केली असता उद्धट उत्तरे दिली जातात. रात्रीच्यावेळी शालेय विद्यार्थी, वृद्धांनी करावे काय ? अशावेळी दुर्गम ठिकाणी चालत जाताना प्रवाशांच्या जिवावर बेतल्यास वाहतूक नियंत्रक जबाबदार राहणार का ? असा सवाल प्रवाशांतून होत आहे.