मालवण,दि.२१ डिसेंबर
दोन दिवसापूर्वी मासेमारी साठी गेलेला मालवण राजकोट येथील ट्रॉलर काल शुक्रवारी रात्री मालवण बंदरात परतत असताना खडकाळ भागात बुडाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या ट्रॉलरवर असलेल्या खलाशानी सुखरूप किनारा गाठला. ट्रॉलर बुडाल्याने १५ लाख रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिक मच्छीमारांनी आपल्या नौकांद्वारे ट्रॉलरला ओढत किनाऱ्यावर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यात यश आले नाही. आजच्या दुसऱ्या दिवशी बुडालेला ट्रॉलर बाहेर काढण्याचे काम मोठ्या ट्रॉलरच्या साहाय्याने हाती घेण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत जेसीबीच्या मदतीने हा ट्रॉलर किनाऱ्यावर काढण्याचे काम सुरू होते.