सावंतवाडी मंगळवारी संविधान सन्मान कृती समिती तर्फे निषेध मोर्चा समविचारी जनतेने सहभागी होण्याचे आवाहन

सावंतवाडी, दि २२ डिसेंबर
देशात सध्या संविधात विरोधी घटना वारंवार घडत असून त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यातच देशाचे गृहमंत्री आणि संविधानाचे रक्षक असलेले अमित शहा यांनी भर संसदेत बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करून आपली एक प्रकारे संस्कृती जाहीर केली आहे .या घटनेचा निषेध करण्यासाठी येत्या मंगळवार दि .२४ डिसेंबर रोजी संविधान सन्मान कृती समिती सावंतवाडी मार्फत शांततेने निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे.
या संदर्भात समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे उद्धारकर्ते नव्हे तर साऱ्या भारतीयांचे उद्धार करते असून ते सर्वांचे श्रद्धास्थान ठरले आहेत. त्यांनी मोठ्या कौशल्याने लिहिलेल्या संविधानाने साऱ्या देशाला एक संघ व समान पातळीत आणून भारतीय संविधानाचे महात्म्य जगाला दाखवून दिले आहे.
मात्र देशात आता संविधान विरोधी वाढत्या घटना घडत असून दस्तूर खुद्द संविधानाचे रक्षक असलेलेच संविधान विरोधी कृती करीत आहेत या घटनेचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. सदर मोर्चाचे सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून केली जाणार असून मोर्चा प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे .मात्र गांधी चौकात मान्यवर त्या मोर्चा बाबत मार्गदर्शन करणार आहेत.
या संदर्भात शुक्रवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक उद्यानात तथा प्रेरणाभूमीत संविधान प्रेमी कार्यकर्त्यांची सभा होऊन यावेळी अँड शिवराम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत अँड संदीप निंबाळकर, वंचित चे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर ,पत्रकार मोहन जाधव ,भारत मुक्ती मोर्चाचे ॲड सगुण जाधव सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव लाडू जाधव इत्यादींची या समितीत निवडण्यात आली आहे .
सदर मोर्चा हा लोकशाही मार्गाचा अवलंब करून अत्यंत शांततेने व अहिंसक मार्गाने सनदसिलपणे काढण्यात येणार असल्यामुळे संविधान प्रेमींनी तसेच आंबेडकरी प्रेमींनी मोठ्या संख्येने या शांततेच्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन संविधान सन्मान कृती समितीने केले आहे.