किनारपट्टीवर सुरक्षेचे आव्हान निर्माण होणार नाही, असे काम करणार- ना. नितेश राणे

जे प्रामाणिक राहीले त्या कार्यकर्त्यांचे हट्ट पुरविणार;ज्या विरोधकांनी त्रास दिला त्यांना सोडणार नाही

सिंधुदुर्ग, दि. २२ डिसेंबर

हा क्षण ज्या कार्यकर्त्यांमुळे मला अनुभवाला मिळाला. १० वर्षे आमदार म्हणुन काम करत असताना आमच्या भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या भविष्याचा विचार न करता आमच्या खांद्याला खांदा लावुन मला साथ दिली, माझ्याबरोबर प्रामाणिक राहीले. त्या सगळ्या माझ्या हक्काच्या कार्यकर्त्यांचे प्रत्येक हट्ट पुरविणे माझे काम आहे. जी मला मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे, ही या सगळ्यामुळेच आहे. ज्या विरोधकांनी त्रास दिला त्यांना सोडणार नाही. कोकण आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीवर २६/११ प्रमाणे सुरक्षेचे आव्हान निर्माण होणार नाही, असे काम करणार, असल्याचा विश्‍वास मत्स्य व बंदर विकासमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण येथे जल्लोषी स्वागतानंतर ना. नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, संतोष कानडे, मनोज रावराणे, बाळा जठार, दिलीप तळेकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकर्ते आम्हासारख्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना ताकद देतात. स्वतःच्या घराची पर्वा न करता, स्वतःच्या मुला-बाळांना वेळ न देता आम्हाला वेळ देतात, आमच्यासाठी कष्ट करतात, आमच्यासाठी घाम गाळतात, म्हणुन आज तेव्हा हक्काचे लोकप्रतिनिधी मंत्री झालेला आहे. प्रत्येकाला वाटले पाहीजे तो मंत्री झालेला आहे. कार्यकर्ते नसते तर आजचे पद नसत, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचा हट्ट पुरविण्याचा त्यांच्या साथीने पुढेही करणार आहे. कोकणाचे अर्थकारण आंबा, काजु, सुपारी, मासे या सगळ्या गोष्टींवर आहे. किनारपट्टीवर असलेल्या या सगळ्यांना एकत्र घेवुन सिंधुदुर्ग, कोकणचा विकास आतापर्यंत होत आलेला आहे. नारायण राणेंपासुन रविंद्र चव्हाण यांच्यापर्यंत आप्पासाहेब गोगटे या सगळ्या कोकणच्या रत्नांनी काम केले आहे. ज्यांनी या कोकणच्या विकासाला मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे. माझ्याकडे दोन महत्वाच्या खाती आहेत. जिल्ह्याच्या कोकणचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी फार मोठी संधी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी विचार करुन माझ्यावर मत्स्य व बंदर विकासाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. माझ्या पदाची जबाबदारी स्विकारुन माझ्या कोकण, महाराष्ट्राचा मत्स्य व बंदर खात्याच्या माध्यमातुन विकास करेन, असा विश्‍वास ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
ज्या पद्धतीने गैर, अवैध धंदे वाढताहेत कुठल्याही पद्धतीचा सुरक्षेचा आव्हान माझ्या कोकणच्या किनारपट्टीवर येता कामा नये. किंबहुना महाराष्ट्रावर येता कामा नये. २६/११ चा हल्ला हा समुद्र किनारपट्टीच्या माध्यमातुन झाला आहे. राष्ट्रीय विरोधी विचाराचे जे लोक आमच्या किनारपट्टीवर राहत आहेत. त्या सगळ्या गोष्टीवर माझा बारकाईने लक्ष असेल. सागरी सुरक्षा हा महत्वाचा भाग आहे. नुसता विकास विकास बोलत राहीलो आणि उद्या कोणी हल्ला किनारपट्टीवर केला , सीआरझेड अशी अतिक्रमण जे वाढत चाललेले आहे ते उद्या आपल्याला धोक्याचे ठरु शकतात. काही अतिरेकी संघटनेच्या मानसिकतेची लोक सुद्धा कोकण किनारपट्टीभागात वावर करत आहेत. गेल्याच महिन्यात काही अतिरेकी संघटनेच्या संबंधीत लोक रत्नागिरीत आढळुन आले. ते लोक किनारपट्टी भागात राहत होते. या सगळ्या गोष्टीवर माझा बारकाईने लक्ष असेल, असेही ना. नितेश राणे म्हणाले.

नेहमी आरोप केले जायचे, देवगडचा आमदार कधी मंत्री होऊ शकत नाही, कधी सत्ताधारी होत नाही. आता या पुढे माझ्या देवगडवर कोणीही अशा पद्धतीचा ठपका ठेवु शकत नाही तसा प्रश्‍नही कोणी विचारु नये अशा पद्धतीचे उदाहरण माझ्या निमित्ताने देवगडच्या आमदाराला मंत्री पद मिळाल्याने आहे. पालकमंत्री पद हा माझा विषय नाही. तुम्ही बोललेला विषय प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला जाईल, पण माझ्यावर पक्षाने दिलेली महायुतीचा कार्यकर्ता म्हणुन जबाबदारी पार पाडणार आहे. खा. नारायण राणे आणि रविंद्र चव्हाण यांनी काही प्रकल्प उंबरठ्यावर आणुन ठेवलेला आहे ती कामे पुर्ण करायची आहेत. खा. नारायण राणे यांनी सुरुवातीला मत्स्य खाते सांभाळलेले आहे. आ.दिपक केसरकर, आ.निलेश राणे, माजी आ.अजित गोगटे या सर्वांचा अनुभव सोबत घेवुन मी काम करणार आहे. बाहेर गावी जावुन काम करणाऱ्या तरुणांना पुन्हा कोकणात आणण्याचे काम केले जाणार आहे, असे ना. नितेश राणे म्हणाले.

विरोधकांनी सत्तेत असताना मला खुप त्रास दिला

विरोधक औषधाला शिल्लक असतील त्यांना मी उत्तर देणारच आहे. विरोधकांना नितेश राणे काय आहे? हे त्यांना चांगलेच माहीती आहे. ते सत्तेत असताना विरोधक म्हणुन माझ्याबरोबर कशे वागले? हे मला चांगले माहीती आहे. १५ डिसेंबरपासुन त्यांना ते सगळे आठवत असेल त्यांना आठवण करुन देण्याची खरी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे.