स्मरण मंगोलकर व अनुश्री जाधव ठरले वेगवान जलतरणपटू

चिवला बीच येथील राज्यस्तरीय सागरी जलतण स्पर्धेची सांगता

मालवण , दि. २२ डिसेंबर

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बीच येथे आयोजित १४ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या विविध गटातील स्पर्धेत ५ किलोमीटर अंतराच्या प्रमुख स्पर्धेत मुलांमध्ये बेळगावच्या स्मरण मंगोलकर आणि मुलींमध्ये बेंगलोरच्या अनुश्री जाधव यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळवित मानाची ट्रॉफी पटकावली.

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी १ किमी, २ किमी, ३ किमी आणि ५ किमी अंतराच्या मुलांच्या व मुलींच्या गटातील स्पर्धा झाल्या. यामध्ये १ किमी मुलांमध्ये – स्वरम केळूसकर (ठाणे), मुलींमध्ये गरिमा पाटील (ठाणे), २ किमी मुलांमध्ये वेदांत मिसळे (बेळगाव), मुलींमध्ये रेवा परब (ठाणे), ३ किमी मुलांमध्ये आदी शिरसाट (बेंगलोर), मुलींमध्ये डिंपल गोवडा (बेळगाव), तर ५ किमी मुलांमध्ये स्मरण मंगोलकर (बेळगाव), मुलींमध्ये अनुश्री जाधव (बेंगलोर) हे वेगवान जलतरणपटू ठरले. त्यांना चषक व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेत निमंत्रित गटात मेक्सीको येथील रेगीना स्यांचीस ही महिला स्पर्धक सहभागी झाली होती. तर मूत्रपिंड प्रत्यरोपण शस्त्रक्रिया झालेल्या ठाणे येथील ईशान अनंत काणेकर या १३ वर्षीय मुलाचा स्पर्धेतील सहभागही लक्षवेधी ठरला.

यावेळी राज्य सेक्रेटरी राजेंद्र पालकर, मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, संस्था उपाध्यक्ष निल लब्दे, किशोर पालकर, खजिनदार अरुण जगताप, लाईफगार्ड टीम लीडर युसूफ चुडेचरा, शिवछत्रपती राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागरकन्या रुपाली रेपाळे, सदस्य भास्कर कुलकर्णी, मनीषा शेडगे, श्री. घनश्याम, आरती भारद्वाज, भरत सैनी, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, शिवसेना माजी सचिव किसन मांजरेकर, डॉ. राहुल पंतवालावलकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, सहायक बंदर निरीक्षक अनंत गोसावी, डॉ. सचिन शिंदे, किल्ला रिसॉर्ट मालक उद्योजक बंडू कांबळी मालवण नगरपालिकेचे कर्मचारी महेश परब, संध्या गवळी, श्रद्धा आरेकर, दिनेश राऊत अन्य मान्यवर स्पर्धक, प्रशिक्षक व पालक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.