कुडाळ तालुक्यातील बीएसएनएल सेवा रुग्णशय्येवर

अन्यथा २६ जानेवारीला युवासेनेचे “टॉवरवरून” आंदोलन

कुडाळ, दि.२३ डिसेंबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बीएसएनएल सेवेचे तीनतेरा वाजले असून बहुसंख्य भाग मोबाईल सेवेपासून खंडित झाला आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी युवासेनेकडून मोबाईल टॉवरवर चढून अभिनव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळ नगरपंचायत सभापती मंदार शिरसाट यांनी दिली.
बीएसएनएल ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा देणारी सर्वात जुनी आणि विश्वासार्ह कंपनी आहे. सुरुवातीपासून जिल्ह्यात या एकाच कंपनीची सेवा सुरु होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य ग्राहक बीएसएनएल ग्राहक आहेत. मात्र, केंद्र सरकारने मोबाईल सेवा खासगी कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी बीएसएनएलचे जाणीवपूर्वक नुकसान केले आहे, असा आरोप मंदार शिरसाट यांनी केला.
ठराविक उद्योगपतींची भरभराट व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळेच बीएसएनएल सक्षम होण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. नादुरुस्त झालेले मोबाईल टॉवर्स जाणीवपूर्वक दुरुस्त करण्यात येत नाहीत. शिवसेनेचे विनायक राऊत खासदार असताना त्यांनी जिल्ह्यात मोबाईल टॉवर मंजूर करून घेतले होते. मात्र, त्याच्या पूर्ततेकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. मोबाईल सेवेची अशी अवस्था असताना लँडलाईन सेवा देखील मृतवत झाली आहे. मोबाईल आणि लँडलाईन सेवा शेवटच्या घटका मोजीत असल्यामुळे इंटरनेटची सुविधा घेण्यात देखील अडथळे येत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा हा दुर्गम जिल्हा आहे. येथे आधीच मोबाईल नेटवर्कची बोंब असते. त्यातच भरवशाच्या बीएसएनएल सेवेने दगा दिला आहे. इंटरनेट सेवेचा खोळंबा होत असल्यामुळे सरकारी कामे देखील असून पडली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार खेटे मारावे लागत आहेत.
तसेच व्यापारी वर्गाला देखील बीएसएनएलच्या या सर्विसमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोबाईलवर येणारे ओटीपी तसेच बँकेचे ट्रांजेक्शन होणारे मेसेज देखील उशिरा येत आहेत.
येणाऱ्या महिन्यात बीएसएनएलने सर्व समस्या सोडवल्या नाहीत तर त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी २६ जानेवारी रोजी कुडाळ येथे बीएसएनएल टॉवरवर चढून युवासेनेच्या माध्यमातून लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे.
यासंदर्भात बीएसएनएल ऑफिस येथे जाउन सबडिव्हिजन इंजिनिअर बलवंतकुमार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उदय मांजरेकर, राजू गावंडे, युवासेनेचे शहर प्रमुख संदीप महाडेश्वर, गुरु गडकर प्रथमेश राणे उपस्थित होते.