वेंगुर्ला,दि.६ फेब्रुवारी
शिक्षणाने परिवर्तन घडते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते तळमळीने आत्मसात केले पाहिजे. तर्कशुद्ध विचार करता येणे ही आजच्या काळाची गरज आहे. तसेच आजच्या सामाजिक परिस्थितीचे भान शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उद्योजक विलास गावडे यांनी केले.
वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीचे रा.कृ.पाटकर हायस्कूल आणि रा.सी.रेगे कनिष्ठ महाविद्यालय, व्यवसाय व तंत्र विभाग वेंगुर्ला यांचे स्नेहसंमेलन ३ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. यावेळी व्यासपिठावर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक तथा प्रमुख वक्ते प्रा.रूपेश पाटील, कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र खांबकर, मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, श्री.शेटये, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईप्रसाद नाईक, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष जयवंत मालंडकर, विद्यार्थी प्रतिनिधी पार्थ मालंडकर, सावंतवाडीचे निवडणूक अधिकारी प्रितम वाडेकर, माजी नगरसेविका श्रेया मयेकर आदी उपस्थित होते.
मोठमोठ्या पदावर आपल्या जिल्ह्यातील अधिका-यांच्या संख्या वाढेल तेव्हा येथील विकासाला अधिक चालना मिळेल. त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी जागरूक असले पाहिजे. तळकोकणातही अपार बुद्धिमत्ता लाभलेली असंख्य मुले आहेत. त्यांचा उच्च दर्जाचया सोईसुविधांनी युक्त चांगले मार्गदर्शन लाभल्यास परिणाम निश्चित दिसेल असे प्रा.रूपेश पाटील म्हणाले. या कार्यक्रमात आठवी ते बारावी वर्गाच्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक व विविध विषयांत विशेष प्राविण्य मिळविणा-या सर्व विद्यार्थ्यांचे रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
शिक्षिका उज्जयनी मांजरेकर यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. मनिषा खरात यांनी मान्यवरांची ओळख, पारितोषिकांचे वाचन सविता जाधव यांनी तर सूत्रसंचालन प्रा.महेश बोवलेकर यांनी केले.