वेंगुर्ला,दि.६ फेब्रुवारी
जागृती कला-क्रीडा मंडळाच्या माध्यमातून संजय मालवणकर यांनी उभी केलेली चळवळ त्यांचे शिष्य पुढे घेऊन चालले आहेत ही बाब आश्वासक आहे. मुलांमध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक संस्कार घडविण्यासाठी अशा प्रकारच्या महोत्सवांची नितांत गरज आहे. गरज ओळखून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांनी या महोत्सवाला सहकार्य केले आहे. याही पुढे अशा प्रकारच्या उपक्रमांना आमचे सहकार्य राहील, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी केले.
दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला पुरस्कृत शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग व जागृती कला क्रीडा मंडळ यांनी आयोजित केलेल्या शाश्वत कला क्रीडा जागृतोत्सवाच्या उद्घाटन सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी दै.तरुण भारत संवादचे सिंधुदुर्ग रत्नागिरी संपादक शेखर सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक सुनील डुबळे, शिवसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम, दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे गजानन नाटेकर, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख अॅड. नीता कविटकर, वेंगुर्ला तालुका महिला आघाडी प्रमुख अॅड.श्रद्धा बाविस्कर, वेंगुर्ला तालुका अल्पसंख्यांक महिला आघाडी प्रमुख शबाना शेख, युवासेना वेंगुर्ला शहर प्रमुख संतोष परब, जागृतीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर, तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप सावंत, शाश्वत सेवा संस्थेचे खजिनदार राजकुमार चव्हाण, श्याम कौलगेकर,कविता राऊळ, मनाली कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जागृतीने अनेक खेळाडू आणि कलाकारही घडविले, मात्र संजय मालवणकर यांच्या अकाली निधनानंतर वेंगुर्ल्याची कला क्रीडा चळवळ मंदावली. ही चळवळ आता पुन्हा सक्रिय होत असल्याचा मनस्वी आनंद आहे. प्रास्ताविक महेंद्र मातोंडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.वैभव खानोलकर यांनी केले.