कुडाळ-बाव मार्गाच्या दूरवस्थेवरून ठाकरे शिवसेना आक्रमक

शिवसैनिक आणि ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत केले पायऱ्यांवर आंदोलन

कुडाळ,दि.२४ डिसेंबर 

कुडाळ तालुक्यातील कुडाळ ते बाव या मार्गाची झालेल्या दुरवस्थेबाबत प्रशासनाला जाग येत नसल्याने आज, मंगळवारी उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे आणि बाव, बांबुळी, कविलकट्टा येथील नागरिकांनी बांधकाम विभागावर धडक देत आंदोलन छेडले.
कुडाळ ते बाव या ग्रामीण मार्गाची दुरवस्था झाली असून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पडले आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाच्या दूरवस्थेमुळे दोन नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागलेत. या मार्गाच्या दुरवस्थेबाबत अनेकदा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत. मात्र, या निवेदनांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात ठेकेदाराकडून मुख्य रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम ऑगस्टमध्ये करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. तसेच गणेशचतुर्थीपूर्वी पूर्ण रस्ता वाहतुकीस योग्य करून ग्रामस्थांची अडचण दूर करण्यात येईल आणि रस्त्याचे उर्वरित मंजूर काम पावसाळा संपताच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुडाळचे सहाय्यक कार्यकारी अभियंता धीरजकुमार पिसाळ यांनी लेखी स्वरूपात दिले होते. परंतु, पावसाळा संपून गेल्यावरही या रस्त्याच्या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आज बाव, बांबुळी आणि कविलकाटे या भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम उप विभाग कुडाळ कार्यालयावर धडक देत पायऱ्यावरच आंदोलन केले.
यावेळी कुडाळ ते बाव या मार्गाच्या संपूर्ण कामकाजाला सुरुवात कधी होणार असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला. स्थानिक नागरिकांनी घेतलेल्या पवित्र्यानंतर कुडाळ ते बाव या मुख्य रस्त्यावर रस्त्याचे काम दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी ठेकेदाराकडून सुरू करण्यात येईल. तसेच रस्ता वाहतुकीस योग्य करून ग्रामस्थांची अडचण दूर करण्यात येईल असा असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग कुडाळचे सहाय्यक कार्यकारी अभियंता धीरजकुमार पिसाळ यांनी दिले. यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, या रस्त्याचे काम १ जानेवारीपासून सुरू न झाल्यास २ जानेवारीपासून पुन्हा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी शिवसैनिक आणि नागरिकांनी दिला. यावेळी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेविका ज्योती जळवी, दीपक आंगणे, बाळा वेंगुर्लेकर, नागेश जळवी, सचिन गडेकर, दिनेश गावडे, अमोल जळवी, मिलिंद परब, प्रशांत परब, उत्तम नेवाळकर, रमेश हरमलकर, प्रकाश राणे, दीपक राऊत, नागेश करलकर, रवी मातोंडकर, संजय परब आदी उपस्थित होते.