भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बाल संस्कार शिबिराचे आयोजन

मालवण,दि.२४ डिसेंबर

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण संस्कार विभागाच्या वतीने या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे तालुका संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. हे शिबिर सदर गावांमध्ये पुढील चार दिवस तालुका शाखा संस्कार विभागाच्या वतीने सुरू राहणार असून त्याचा सांगता समारंभ २६ डिसेंबर रोजी होणार आहे.

यावेळी प्रारंभी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माजी राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तर धूपप्रज्वलन सरचिटणीस संजय पेंडूरकर यांनी केले. त्रिसरण पंचशीलने शिबिराची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी धम्मपिठावर विद्यमान जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, माजी राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष भीमराव जाधव, जिल्हा महिला संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडूरकर, जिल्हा प्रचार व पर्यटन सचिव विलास वळंजू, तालुकाध्यक्ष रविकांत कदम, सरचिटणीस प्रकाश पवार, कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम, महिला तालुका अध्यक्ष नेहा काळसेकर, संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार, सचिव योगेश वराडकर, तालुका हिशोब तपासणीस शंकर कदम प्रचार व पर्यटन सचिव सचिन कासले, संरक्षण सचिव रमेश कदम, कार्यालयीन सचिव मनोज काळसेकर, संघटक अर्जुन पेंडूरकर, भरत पेंडूरकर इत्यादी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी बाल संस्कार शिबिराचे महत्त्व विशद केले व शिबिरास शुभेच्छा दिल्या तसेच माजी राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, तालुकाध्यक्ष रविकांत कदम, नेहा काळसेकर यांनीही आपल्या मनोगतातून शिबिरास शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना नचिकेत पवार यांनी संस्काराची गरज का आहे? तसेच भारतीय नागरिक, बौद्ध अनुयायी म्हणून आपले वर्तन कसे असावे याबाबत आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश वराडकर तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रकाश पवार यांनी केले.

शिबिराच्या प्रथम सत्रामध्ये उद्घाटन कार्यक्रमानंतर जिल्हा प्रचार व पर्यटन सचिव विलास वळंजू यांनी पंचांग प्रणाम व त्रिसरण पंचशील याचे महत्त्व शिबीरार्थींना पटवून सांगितले. तर दुसऱ्या सत्रामध्ये तालुका कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी सिद्धार्थ गौतमाचे बालपण या विषयाच्या माध्यमातून बालपणी आपले वर्तन कसे असावे याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच योगेश वराडकर यांनी आपल्या जादूच्या प्रयोगांच्या माध्यमातून अंधश्रद्धा व विज्ञान या विषयाची प्रात्यक्षिके करून दाखवली. शिबिराच्या दुसऱ्या सत्रामध्ये जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, माजी कणकवली तालुका अध्यक्ष गोपीचंद पवार, सामाजिक कार्यकर्ते संजय धारपवार, जिल्हा पदाधिकारी दीपक कांबळे यांनीही सदिच्छा भेट दिली. सदर शिबिरामध्ये गोळवण, वडाचापाट, तळगाव, वराड, चौके, काळसे व मसदे या गावशाखांमधून एकूण ५५ शिबिरार्थिनी सहभाग घेतला होता. तसेच मोठ्या संख्येने तालुक्यातील अनेक गावशाखेचे अध्यक्ष, पदाधिकारी, उपासक व उपासिका उपस्थित होत्या.