‘डार्विन लुटताना’ म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा आसूड – कवी अजय कांडर

डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या काव्यसंग्रह प्रकाशन

कणकवली,दि.२४ डिसेंबर

मानवी नात्याची ओढ, समूहाबद्दलची आपलेपणाची भावना आणि प्रेमाची असोशी त्याचबरोबर भ्रष्ट व्यवस्थेबद्दलचा आसूड या सगळ्या संदर्भाची मांडणी ‘डार्विन लुटताना’ या काव्यसंग्रहा मधील कवितेत करण्यात आली आहे, असे प्रतिपादन कवी तथा भारतीय साहित्य अकादमीचे माजी सल्लागार सदस्य अजय कांडर यांनी येथे केले.

कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘डार्विन लुटताना’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा येथील हॉटेल नीलम कंट्री साईटच्या सभागृहात कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

यावेळी बोलताना कांडर यांनी ‘डार्विन लुटताना’ मधील कविता अतिशय गंभीरपणे लिहिली गेली असून भविष्यात डॉ.आंबेरकर यांच्या कवितेचा भविष्यकाळ मराठी साहित्यात उज्वल असल्याचेही आग्रहाने सांगितले. नाट्यकर्मी डॉ.राजेंद्र चव्हाण, कवी डॉ. अमूल पावसकर, कवयित्री डॉ.दर्शना कोलते, वर्षा आंबेरकर , डॉ.कुमार ननावरे (कोल्हापूर), डॉ. आकेरकर, डॉ. विद्याधर तायशेटे, कवी डॉ.अनिल धाकू कांबळी,कवी मधुकर मातोंडकर, रंगकर्मी वामन पंडित, डॉ. शमिता बिरमोळे, डॉ. सुहास पावसकर, डॉ.विनय शिरोडकर, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. प्रतिभा नाटेकर आदीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर व बहुसंख्येने साहित्य रसिक उपस्थित होते.
डॉ.चव्हाण म्हणाले, डॉ आंबेरकर यांची कविता म्हणजे निरागस, लोभस, नाजूक आणि विशुद्ध नात्याचा शोध आहे. स्वतःवरचं निसर्गाचं ऋण जपणारी कविता आहे. सेवाभावी डॉक्टरचं जगणं हा जणू मोक्ष मार्ग आहे असा हा कवी जाणून आहे. डॉ.कोलते म्हणाल्या, ‘डार्विन लुटताना’ मधील कविता चिंतनाच्या पातळीवर व्यक्त होते. या कवितेला स्वतंत्र वाचक मिळेल.

डॉ.आंबेरकर म्हणाले, कविता खूप वर्ष लिहितो परंतु मध्यंतरीच्या काळात आपण काही चांगलं लिहू असा आत्मविश्वास नव्हता. मात्र पुढे अनेक मित्रांच्या प्रोत्साहनामुळे मी लिहू लागलो आणि ‘डार्विन लुटताना’ काव्यसंग्रह निव्वळ प्रभा प्रकाशनामुळे निघू शकला. माझ्या कवितेची पहिली वाचक माझी पत्नी वर्षा. कवीच्या लेखनाला प्रोत्साहन मिळतं तेव्हाच ते लेखन सातत्याने होत असतं. आज आपण सर्वांनी जी प्रेरणा दिली त्यातून भविष्यात सातत्याने काव्य लेखन होत राहील. यावेळी कवी मधुकर मातोंडकर,डॉ.नितीन शेट्ये, डॉ संजय सावंत यांनीही विचार व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा. मनीषा पाटील यांनी केले, प्रास्ताविक डॉ.विनय शिरोडकर यांनी केले तर आभार डॉ. संदीप नाटेकर यांनी मानले.