बॅरिस्टर नाथ पै क्रीडांगणावर उद्यापासून रंगणार पिंगुळी महोत्सव

कुडाळ,दि.२४ डिसेंबर 

ग्रामपंचायत पिंगुळी, साईकला मंच आणि पिंगुळी ग्रामस्थ आयोजित पिंगुळी महोत्सव २०२४ ला उद्या, २५ पासून बॅरिस्टर नाथ पै क्रीडांगण एमआयडीसी पिंगुळी-कुडाळ येथे दिमाखात सुरुवात होत आहे. सायंकाळी ४ वा. भव्य शोभायात्रेने विविध लक्षवेधी देखाव्यासह या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. २५ ते २७ या कालावधीत होणाऱ्या पिंगुळी महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी त्याचबरोबर संपूर्ण भारतभर नावाजलेला मुंबईतील कलाकारांचा प्रसिद्ध बँड “अभंग रिपोस्ट” हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई यांनी दिली.
उद्या, २६ डिसेंबरपासून पिंगुळी महोत्सव सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी महोत्सवाच्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सरपंच अजय आकेरकर, बॅरिस्टर नाथ पै संस्था अध्यक्ष उमेश गाळवणकर, उद्योजक गजानन कांदळगावकर, साईकला मंचाचे अध्यक्ष भूषण तेजम, अमित तेंडोलकर, पोलीस पाटील सतीश माड्ये, वैभव धुरी, मंगेश चव्हाण, दीपक गावडे, बाबल गावडे, सचिन सावंत, दर्शन कुडव, मयूर लाड, निलेश प्रभू, राज वारंग आदी उपस्थित होते.
देसाई म्हणाले की, महोत्सवाच्या  पहिल्या दिवशी उद्या, २५?डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता श्री देव रवळनाथ मंदिर ते बॅ नाथ पै क्रीडांगण या ठिकाणी भव्य मिरवणूक होणार आह. या मिरवणुकीत पिंगुळी गावाची महती सांगणारे चित्ररथ, ढोलपथक, बैलगाडी देखावे, पांगुळ बैल ही विविधता  महोत्सवात असणार आहे. या महोत्सवाची  सुरुवात कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिच्या गणेश वंदनाने होणार आहे. त्यानंतर उद्घाटन समारंभ होईल. यावेळी पिंगुळी गावातील आजी-माजी सरपंच उपसरपंच यांचा सत्कार होणार आहे. सायंकाळी ७ वा. कळसूत्री बाहुल्या, पांगुळ बैल सादरीकरण, नवीवाडी महिलांचे टाळ नृत्य हा अनोखा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता खेळ पैठणीचा तर रात्री ९ वाजता मिस पिंगुळी सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धा होणार आहे. गुरुवार, २६ डिसेंबरला गणेशवंदना, सायंकाळी ६ वाजता “मुक्काम पोस्ट कॉमेडीवाडी” हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये टीव्ही कलाकार विश्वजीत पालव, कल्याणी साखळूनकर आणि मुकेश जाधव या कलावंताचा समावेश आहे. तर रात्री ८ वाजता नृत्य महोत्सव २०२४ होणार आहे. शुक्रवार, २७ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता गणेश वंदना त्यानंतर पिंगुळी गावातील गायक, वादक, नृत्य कलाकार यांचा संगीतमय कार्यक्रम होणार. रात्री ९!वाजता संपूर्ण भारतात नावाजलेला मुंबईतील कलाकारांचा प्रसिद्ध बँड अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम होणार आहे. दरदिवशी समारोपवेळी लकी ड्रॉ काढले जाणार आहेत. दरम्यान, या महोत्सवात विविध असे ८० स्टॉल सहभागी झाले आहेत. उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी या अनुषंगाने विविध स्टॉल आहेत. त्याचबरोबर वाहन क्षेत्रातील ऑटो इंडस्ट्रियल स्टॉल या ठिकाणी असणार आहेत. महोत्सवाची सुरुवात आजपासून रांगोळी स्पर्धेने झाली आहे.

पिंगुळी गावासाठी सुसज्ज रुग्णवाहिका -अजय आकेरकर
या पिंगुळी महोत्सवात जो निधी उपलब्ध होईल त्या निधीतून गावासाठी सुसज्ज रुग्णवाहिका आणण्याचा मनोदय पिंगुळी महोत्सवाचे प्रमुख सरपंच अजय आकेरकर यांनी व्यक्त केला. या अगोदर दहीहंडी उत्सवात जो निधी जमा झाला आहे तो निधी सुद्धा यासाठी वापरला जाणार आहे. पिंगुळी गावात ९० बचतगट आहेत. या बचतगटातील उपस्थित महिलांना भेटवस्तू तसेच पर्यावरण जनजागृतीसाठी ग्रामपंचायत मार्फत कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत. २७ ला सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आयुष्यमान भारतकार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचा लाभ पिंगुळीवासियांनी घ्यावा, असे आवाहन केले. कचरामुक्त पिंगुळी, वृक्षलागवड मोहीम तसेच विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपला पिंगुळी गांव राज्यस्तरावर  कसा येईल या दृष्टीने आपण सर्वांच्या सहकार्याने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.