वेंगुर्ला,दि.२४ डिसेंबर
वेंगुर्ला शहर हे स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळखले जाते व शहराला राज्य व देश पातळीवर स्वच्छतेबाबत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. असे असताना शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे स्वच्छ व सुंदर शहराला खड्डयांचे ग्रहण लागले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी केला आहे.
भूमिगत वीजवाहिनी घालणे तसेच गॅस पाईप लाईन घालण्यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आलेले होते. परंतु, संबंधित ठेकेदारांनी या रस्त्याची योग्यरित्या डागडूजी केलेली नाही. तर आपल्या मनमानीप्रमाणे रस्त्यांची खोदाई केलेली असून ठेकेदाराने रस्त्याच्या मधोमध चर खोदलेले होते. ते चर योग्यरित्या न भरल्याने त्याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा प्रचंड त्रास वाहनचालक तसेच पादचा-यांना देखील होत आहे. असे असताना नगरपरिषद प्रशासन संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे ठेकेदारावर नगरपरिषद एवढी मेहरबान का आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन शहरातील खड्डे बुजवावेत तसेच संबंधित ठेकेदारांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा याचे गंभीर परिणाम प्रशासनास भोगावे लागतील असा इशाराही अॅड.सातार्डेकर यांनी दिला आहे.