मालवण,दि.२४ डिसेंबर
मच्छिमार संस्थांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन संस्थेचे बळकटीकरण व विस्तार करण्याचा प्रयत्न करावा, सहकाराच्या माध्यमातून नीलक्रांती अधिक प्रभावशाली करता येईल, असे प्रतिपादन मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी येथे बोलताना केले.
लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अॅकॅडमी फोर को- ऑपरेटिव्ह रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र एनसीडीसी पुणे, सहकार मंत्रालय भारत सरकार आणि मत्स्य व्यवसाय विभाग भारत सरकार व मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छीमारांसाठी एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत आयोजित या कार्यशाळेला महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर, राष्ट्रीय सहकार विकास निगम पुण्याचे प्रादेशिक संचालक विनीत नारायण, प्रमुख पाहुण्या तहसीलदार वर्षा झालटे तसेच जिल्ह्यातील मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थेचे मच्छिमार सभासद उपस्थित होते.
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक बहर महाकाळ यांनी प्रास्ताविक केले. विनीत नारायण यांनी सहकारी संस्थांनी पुढाकार घेऊन केंद्राच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले. केंद्राच्या नवीन धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार हा खोल समुद्रातील मासेमारी करण्यास १२ ते २०० समुद्र मैलापर्यंत जाऊ शकतो. मत्स्य व्यवसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प असून महिलांनी एकत्र येऊन मत्स्यसंस्था स्थापन करायला हव्यात, अशी अपेक्षा महाकाळ यांनी व्यक्त केली. मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांसाठी असलेल्या विविध योजनांसाठी प्रस्ताव कसे तयार करायचे, या संदर्भात महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अधिकारी सुरज यलपाले यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान मच्छीमार बांधवांसाठी झालेल्या सादरीकारणामध्ये महेश कडलग यांनी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रशिक्षणादरम्यान शासनाच्यो मत्स्य व्यवसाय विभागाच्या विविध योजनांबाबत सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांनी मार्गदर्शन केले. महेश कडलग यांनी आभार मानले.