बांदा खेमराज हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक गुरूवर्य कृष्णाजी वराडकर यांचे निधन

बांदा,दि.२५ डिसेंबर
बांदा खेमराज हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक गुरूवर्य कृष्णाजी अनंत वराडकर (वय ९९) यांचे काल मंगळवारी सायंकाळी उभादांडा-वेंगुर्ले येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. बांदा दशक्रोशीत शिक्षण तपस्वी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी ग्रामीण भागात अनेक शाळा उभारणीसाठी योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळतंच शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत अंत्यदर्शन घेतले.
हजारो विद्यार्थी घडवणारे आदर्श शिक्षक कृष्णाजी वराडकर यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य हे अतुलनीय होते. जुलै १९८३ साली ते बांदा येथील खेमराज हायस्कुलमधून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. अध्यापनाच्या काळात ते स्वतः चालत ग्रामीण भागातील शाळेत जाऊन गणित शिकवायचे. त्यांचा गणित विषयात हातखंडा होता. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान पाहून संस्थेने त्यांच्यावर प्रशासकीय अधिकारी पदाची जबाबदारी दिली होती. त्या पदाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात अनेक शाळा घडविल्या. त्यांचा विद्यार्थी वर्ग आज विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे. आज बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मडुरा हायस्कुलचे शिक्षक सुहास वराडकर यांचे ते वडील होत.