म्हणूनच दळवी यांच्या दर्जेदार व व्यक्तिरेखा जबरदस्त प्रभावी झाल्या-वृंदा कांबळी

वेंगुर्ला,दि. २५ डिसेंबर

कोणताही लेखक व्यक्ति चित्रणासाठी किवा प्रसंग निर्मितीसाठी त्याच्या जगण्याच्या भोवतालातूनच निरीक्षणातून बीजे निवडत असतो. पण जयवंत दळवींनी त्यांना भेटलेल्या, पाहिलेल्या माणसांचे ताणतणाव, अंतर्गत पीळ समजून घेतले त्याविषयीचे चिंतन त्यानी आपल्या साहित्यातून मांडले त्यामुळेच त्यांच्या साहित्यकृती या दर्जेदार झाल्या. त्यांच्या व्यक्तिरेखा जबरदस्त प्रभावी झाल्या, असे प्रतिपादन लेखिका वृंदा कांबळी यांनी म्हापसा येथे बोलताना केले.

गोवा राज्यातील म्हापसा येथील लक्ष्मी नारायण संस्थानच्या सभागृहात ‘शेकोटी साहित्य संमेलन‘ आयोजित केले होते. या संमेलनातील जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त जयवंत दळवी यांच्या साहित्यावरील विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या विशेष कार्यक्रमासाठी वक्ते म्हणून त्याना निमंत्रित करण्यात आले होते. लेखिका वृंदा कांबळी पुढे म्हणाल्या की, साहित्यिक जयवंत दळवी हे मानसशास्त्राचे पदवीधर असल्याने ते जिज्ञासू अभ्यासक होते. त्याना मानवाच्या अंतर्गत मनोव्यापारासंबंधी कुतूहल होते. त्यामुळेच त्यांनी माणसाला समजून घेण्यासाठी चिंतन केले. माणसातल्या आतल्या माणसाचा शोध घेण्याचा सतत प्रयत्न केला. जयवंत दळवी यांनी कथा व कादंब-यांची नाट्यरूपांतरे केली. तसं करणं हे अवघड असतं. कारण मूळ आशयाला धक्का न लावता ते नाटकाच्या चौकटीत बसवायचे असते. कथा कादंब-यांचे निर्मिती कौशल्य व नाट्यलेखनाची कौशल्ये ही भिन्न भिन्न असतात. पण दळवींनी ती समजून घेऊन आत्मसात केली व ही आव्हानेही लीलया पेलली, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रविण जोशी, वृंदा केळकर व निवेदक मेधा जाधव उपस्थित होते. गोवा मराठी परिषदेचे अध्यक्ष सुदेश आर्लेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. मेधा जाधव यांनी आभार मानले.