प्रा. सीमा हडकर, मधुकर मातोंडकर, मोहन कुंभार , किशोर कदम यांची उपस्थिती
मसूरे,दि.२६ डिसेंबर (झुंजार पेडणेकर)
कणकवली येथे पहिल्या एक दिवशीय सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या स्मरण ग्रंथाचे नामवंत कवी अजय कांडर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
येथील फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या सभागृहात सदर ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कणकवली कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख प्रा.सीमा हडकर,कवी मोहन कुंभार आणि संमेलनाचे प्रमुख पाहुणे कवी / सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर यावेळी सम्यक संबोधी साहित्य संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंखे, उपाध्यक्ष संदीप कदम, सदस्य धम्मपाल बाविस्कर, सत्यवान साटम आदी उपस्थित होते.
कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर सम्यक संबोधी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून या स्मरण ग्रंथांमध्ये बांदेकर यांच्या कादंबरीवर समीक्षक डॉ. दत्ता घोलप यांचा अभ्यासपूर्ण लेख तर सम्यक संबोधी पुरस्कार विजेते कवी सफरअली यांच्या ‘अल्लाह ईश्वर’ या काव्यसंग्रहावर कवी मोहन कुंभार यांचा लेख तसेच संमेलनाचे प्रमुख पाहुणे मधुकर मातोंडकर यांच्या सांस्कृतिक वाटचालीविषयीचा लेख तर कविसंमेलनाध्यक्षा संध्या तांबे यांचा परिचय करून देणारा लेख आदी लेखनाचा समावेश या ग्रंथात करण्यात आला आहे.