शिरोडा-वेळागर भुमीपुत्र संघाच्या पदाधिकारी शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन व चर्चेव्दारे मागणी
वेंगुर्ले,दि.६ फेब्रुवारी
शिरोडा-वेळागर येथे ग्लोबल स्टॅण्डर्ड हॉस्पीटॅलिटी युनिटची स्थापना करण्यासाठी आणि सदर प्रकल्प जलद गतीने कार्यान्वीत करण्यासाठी, ज्या खाजगी जमिन मालकांच्या जागांचा सर्व करण्यात आलेला आहे. व जमिन संपादीत केलेली आहे. त्या जमिनीची वाढीव नुकसान भरपाई देण्याबाबत सर्व केल्यानंतर तीन टप्यात ६० कोटी रुपयांचे वितरण होण्याचे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ठरले होते. तसे आदेश शालेय शिक्षण मंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेले होते. मात्र अद्याप त्याची पुर्तता झालेली नाही. चालू फेब्रुवारी महात पहिल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील रक्कमेचे वितरण सुरू करावे. अशी मागणी शिरोडा वेळागर भुमीपुत्र संघ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेत लेखी निवेदन व चर्चेव्दारे मागणी केली आहे.
शिरोडा वेळागर येथे ग्लोबल स्टॅण्डर्ड हॉस्पीटँलिटी युनिटची स्थापना करण्यासाठी आणि सदर प्रकल्प जलद गतीने कार्यान्वीत करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने सन १९९२ मध्ये शिरोडा वेळागर येथील सर्वे नंबर-१, ४, ५, ६, ७, २९. ३०, ३१, ३२, ३३, ३४, ३, ५, ३६, ३७ आणि ४२ मधील एकूण १०२.८७ एकर खाजगी जमीन मालकांची जमीन संपादित केली आहे. आज मितीस सदर जमीन एम.टी.डी.सी. M.T.D.C. च्या नावे असून एम.टी.डी.सी. M.T.D.C. ने सदर १०२.८७ एकर व शासनाची ३१.५४ एकर अशी एकूण १३४.४ एकर जमीन ताज ग्रुपला हॉटेल उभारणीसाठी भाडे कराराने दिलेली आहे. सदर १०२.८७ एकर जमिनीच्या जमीन मालकांनी शासनाने दिलेल्या अत्यल्प नुकसान भरपाईला आक्षेप घेतला होता. त्या आक्षेपाला अनुसरून महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा या विभागाचे आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रालयात दि. ८ जून २०२३ रोजी ताज ग्रुपचे प्रतिनिधी व शिरोडा वेळागर जमीन मालकांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करून सदर बैठकीत ताज ग्रुपने ग्रामस्थांच्या प्रतिनिधी समवेत चर्चा करून ६० कोटी रु. वाढीव नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. त्यानुसार सदरची वाढीव नुकसान भरपाई जमिनीचा सर्व पूर्ण झाल्यावर व बांधकामाला सुरुवात झाल्यावर तीन टप्यात सदर रक्कम देण्यात येईल असे मान्य करण्यात आले.
शिरोडा वेळागर येथील १०२.८७ एकर जमिनीपैकी सर्वे नं. १, ४, ५, ६, ३३. ३४, ३९, ३६, ४२ मधील एकूण ८५ एकर जमिनीचा सर्वे ऑगस्ट २०२३ ला पूर्ण झाला आणि उर्वरित सर्वे नं. ० २९, ३०, ३१ व ३२ मधील जमिनीचा सर्व पूर्ण झालेला नाही.
डिसेंबर २०२३ मध्ये लिंगेश्वर मंदिर शिरोडा येथे आपणांसमक्ष शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ग्रामस्थां समवेत घेतलेल्या बैठकीत आपणास खालील आदेश दिले होते. यात लिंगेश्वर मंदिराच्या विहिरीबाबत ताज प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून प्रश्न निकालात काढणे. व ताज प्रशासनाच्या वरिष्ठांची चर्चा करून सर्व पूर्ण झालेल्या ८५ एकर जमिनीतील शेतकऱ्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वाढीव नुकसान भरपाईचे वाटप करणे. आपणास मंत्री महोदयांकडून दिलेल्या आदेशांची अजून पूर्तता न झाल्यामुळे आम्ही आपणास हे निवेदन सादर करीत आहोत.
चौकड
शिरोडा-वेळागर येथील ताज प्रकल्पासाठी शिरोडा-वेळागर भुमीपुत्र संघ या संस्थेच्या 120 सदस्यांनी या भागाच्या विकासासाठी जमीन दिली. गेल्या 32 वर्षात कांहीच झाले नाही. असे असताना शासनाने मंत्री दिपक केसरकर यांनी पर्यटन दृष्टिकोन ठेवून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, एम.टी.डी.सी. अधिकारी व ताज प्रकल्पाचे प्रतिनिधी समवेत बैठक घेतली. या बैठकीत ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना वाढीव नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. जानेवारी पहिल्या आठवड्यापासून तीन टप्प्यात वाढीव नुकसान भरपाई देण्याचे तशा सुचना वजा आदेश जिल्हाधिकारी यांना श्री.केसरकर यांनी दिले. असे असताना प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई बाबत जमीन देणाऱ्या भुमीपुत्रांतून तीव्र नाराजी पसरलेली आहे. आता शासनाने तातडीने ती वाढीव नुकसान भरपाई दोन टप्प्यात द्यावी. या मागणीने जोर धरला आहे.
आपण मंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशाची पूर्तता करून जमिनीचा सर्व पूर्ण झालेल्या जमीन मालकांना लवकरात लवकर वाढीव नुकसान भरपाईचे वाटप करावे. अशी आमची मागणी असल्याचे लेखी निवेदनांत नमुद करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना शिरोडा वेळागर भुमीपुत्र संघातर्फे लेखी निवेदन सादर करताना संघाचे खजिनदार जगन्नाथ डोंगरे तसेच सदस्य जनार्दन पडवळ, नाना कांबळी, मंगेश डोंगरे, नंदकिशोर कांबळी, मिलिंद रेडकर आदी उपस्थित होते.