देवगड,दि.२६ डिसेंबर
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ (रजि.) आयोजित किल्ले विजयदुर्ग दीपोत्सव एक जानेवारी २०२५ रोजी किल्ले विजयदुर्ग या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. एक पणती मावळ्यांसाठी एक दिवा सैनिकांसाठी, या उपक्रमांतर्गत बुधवार दिनांक १ जानेवारी दुपारी ३.३० वा. विजयदुर्ग पंचक्रोशीतील विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये या तिन्ही गावातील ग्रामस्थांसह सडेवाघोटण, पडेल, मोंड ,वाडा ,मणचे, फणसे, सौंदाळे तिलोट, येथील शिवप्रेमी मिळून ५० मशाली ५००० पणत्यांसह, हा दिपोत्सव किल्ले विजयदुर्ग या ठिकाणी साजरा करणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीसह ढोल ताशांच्या गजरात ऐतिहासिक व सांस्कृतिक या मिरवणुकीत सहभागी होऊन दीपोत्सव साजरा करीत छत्रपती शिवराय स्वराज्याच्या मावळ्यांना व सैनिकांना मानवंदना देण्याकरता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक (सिंधुदुर्ग) ऋषिकेश रावले व अतुल रावराणे हे उपस्थित राहणार आहेत
या निमित्त श्रीमंत योगी मर्दानी आखाडा शिवकालीन युद्ध कला केंद्र मु. पो. पाडळी खुर्द तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांची शिवकालीन युद्ध कला व ,मर्दानी खेळातील प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शुक्रवार ३ जानेवारी महा रक्तदान शिबिर विजयदुर्ग, रामेश्वर ,गिर्ये कोलवाडी घरी वाडी येथील ग्रामस्थांसह विजयदुर्ग पोलीस स्टेशन सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त २९ डिसेंबर २०२४रोजी सकाळी ९ वा. विजयदुर्ग किल्ला या ठिकाणी विजयदुर्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थ स्वच्छता अभियानात सहभागी होणारे शिवप्रतिष्ठान मित्र मंडळ ,वरची पुजारेवाडी नाडण, गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य, कोकण विभाग व शिवप्रेमी मंडळ यांच्या वतीने विजयदुर्ग किल्ला या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.