अभाविपच्या ५९ व्या कोकणप्रांत अधिवेनाचे शानदार उद्घाटन
विद्यार्थ्यांची ताकद ही भविष्यातील देशाची ताकद विद्यार्थी परिषदेने देशाला अनेक नेते दिले तो इतिहास जपा
सावंतवाडी दि.२७ डिसेंबर
विद्यार्थी परिषदेचा इतिहास वेगळा आहे. विद्यार्थ्यांची ताकद भविष्यातील देशाची ताकद आहे. या संघटनेने देशासाठी नेतृत्व करणारे अनेक नेते दिले आहेत. तो इतिहास आपण जपला पाहिजे. त्यासाठी ही संघटना ज्यांनी घडवली त्यांना अभिमान वाटावं असं कार्य करा. हिंदुराष्ट्रात आपण काम करतो. राष्ट्र प्रथम आपण मानतो. या राष्ट्राला विकसित करण्यासह सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. आपली ती जबाबदारी आहे हे स्वीकारून वागलं पाहिजे. आपल्या राष्ट्राकडे वाकड्या नजरेने कोणी पाहू नये यासाठी तुमचं काम कार्य तुमची निष्ठा व तुमचा कडवटपणा हे देखील महत्त्वाचं आहे. हिंदु राष्ट्राचा नागरिक म्हणून हे राष्ट्र सुरक्षित राखण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ठेवा. तुमच्या या वाटचालीत आम्ही सर्वजण तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत राहू, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५९ व्या कोकण प्रांत अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करताना ना. नितेश राणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विकसित व समृद्ध कोकणासोबतच सुरक्षित कोकणाची गरज विशद केली.
ते म्हणाले, समृद्ध कोकण, विकसित कोकणासह आता भगवं कोकणं असं मी म्हणेन. कारण हिंदुत्व ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत ही ओळख निर्माण करण्यासाठी फार मेहनत घेत आहेत.
मात्र, आपण विकसित राष्ट्राचे स्वप्न पाहत असताना काही जण २०४७ ला हिंदुस्तानला इस्लाम राष्ट्र करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या वेळी विरोधकांकडून होणाऱ्या आक्रमणांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्यात तो कडवटपणा असला पाहिजे. तरच आपल्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पहाणार नाही. दहशत माजवायची हिंमत कोणी करणार नाही. या अधिवेशनात पुढे जात असताना हिंदूराष्ट्राला तुमची मदत होईल अशी भुमिका घेऊन जा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
हिंदू राष्ट्राला विकसित करण्यासह राष्ट्र सुरक्षित ठेवणंही तेवढंच आवश्यक आहे. ज्या राष्ट्राचे आपण नागरिक आहोत ज्या कोकण भूमीचे आपण प्रतिनिधी आहोत ती भूमी सुरक्षित ठेवणे ही आपली ती जबाबदारी आहे. बांग्लादेशी, रोहींग्यो मुसलमान आपल्या किनारपट्टीवर मस्ती करू पाहत आहेत. या खात्याचा मंत्री म्हणून त्यांची मस्ती खपवून घेणार नाही. माझ्यावर हिंदूत्वासाठी कार्य करताना ३८ केसेस झाल्यात. धर्मासाठी घेतलेल्या या केसेसचा मला अभिमान आहे. तुमच्यातील अनेक जण भविष्यातील देशाचे नेतृत्व करणार आहेत त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेसाठी प्रसंगी अशा केसेस घेण्याची तयारी ठेवा, असेही ते म्हणाले.
मंत्री म्हणून विकास अन् निधी देण्यासह माझं राष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी माझा प्रयत्न आहे. विकास हा महत्त्वाचा आहे मात्र भारतीय म्हणून आपण जर जिवंतच राहिलो नाही तर विकास कोणासाठी राहणार असा सवाल करतानाच विकासासोबतच सुरक्षा देखील महत्त्वाची आहे हे त्यांनी सांगितले. आज अनेक बांग्लादेशी, रोहींग्यो मुसलमान आपल्या भागात येत आहेत. किनारपट्टीवर मस्ती करू पहात आहे. या खात्याचा मंत्री झाल्यावर मी संपूर्ण किनारपट्टीचा सर्वे करायला सांगितला आहे. कोकणची ७२० किलोमीटरची किनारपट्टी आहे यातील किनारपट्टीवर नेमके काय चालले आहे त्याचा अभ्यास केला जाणार असून देशाच्या सुरक्षेसाठी त्या दृष्टीने कडक पावले उचलली जाणार आहेत. किनारपट्टीवर कोण मस्ती करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
हिंदु राष्ट्राचा नागरिक म्हणून हे राष्ट्र भगवं व सुरक्षित राखण्यासाठी मी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ठेवेन अशी शपथ घेऊन या अधिवेशनातून बाहेर जा. हिंदु राष्ट्राच्या तुमच्या या वाटचालीत आम्ही सर्वजण तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत राहू असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रांताच्या ५९ व्या कोंकण प्रांत अधिवेशनाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर, भोसले नॉलेज सिटी येथे प्रारंभ झाला. याच उद्घाटन प्रा.डॉ.मनिष जोशी यांच्या हस्ते व मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने अधिवेशनाला सुरूवात झाली. यावेळी व्यासपीठावर मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रा. डॉ. मनिष जोशी, स्वागत समिती अध्यक्ष अतुल पै काणे, स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, प्रांत अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर, प्रांत मंत्री राहुल रजोरीआ, सावंतवाडी शहराध्यक्ष डॉ. साईनाथ सितावार, शहरमंत्री स्नेहा धोटे आदी उपस्थित होते. पुढील दोन दिवस हे अधिवेशन होणार असून कोकण प्रांतातील एक हजार विद्यार्थी याला उपस्थित आहेत.
अधिवेशनाचे उद्घाटक प्रा. डॉ. मनिष जोशी म्हणाले, कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनीच मोठा संघर्ष केला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून माझ्यासारख्याला कोकणची ओळख झाली. विकसित देशात विद्यार्थी परिषदेचं योगदान फार मोठे आहे. नव्या शैक्षणिक धोरणासाठी या परिषदेने खूप मेहनत घेतली आहे. युजीसीच्या माध्यमातून शैक्षणिक दृष्ट्या विकसित व्हा, २०४७ ला भारत सुरक्षित, विकसित असला पाहिजे. यासह सर्वांगीणदृष्ट्या विकासित राष्ट्र असाव यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केलं.
प्रास्ताविक स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर यांनी केले. अधिवेशनाचे सुत्रसंचालन स्नेहा धोटे, आभार साईनाथ सितावार यांनी मानले. याप्रसंगी स्वागत समिती सदस्य प्रभाकर सावंत, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सुधीर आडीवरेकर, अन्नपूर्णा कोरगावर, उदय नाईक, आनंद नेवगी, अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, ऐश्वर्या कोरगावकर, डॉ. प्रसाद देवधर, ॲड. सुषमा खानोलकर, डॉ. राजशेखर कार्लेकर, प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई,व्यवस्था प्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर, अवधूत देवधर आदी उपस्थित होते.