महोत्सवांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रथा परंपरा जपण्याचे काम महाराष्ट्र शासन करीत आहे-जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण

सावंतवाडी,दि.६ फेब्रुवारी
महाराष्ट्र हा लोककला व सण, उत्सवांना महत्व देणारा आहे‌. येथील लोक उत्साही आहे. आपली संस्कृती जपताना ते पहायला मिळतात. इथल्या रूढी, परंपरा जपण्याच काम पिढ्यानपिढ्या सुरु आहे. अशा महोत्सवांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रथा परंपरा जपण्याचे काम महाराष्ट्र शासन करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी केले.
सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग आयोजित सिंधू महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे,
मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, तहसीलदार श्रीधर पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री चव्हाण म्हणाले, कोरोनासह मध्यल्या आघाडी शासनाच्या काळात सांस्कृतिक चळवळीवर परिणाम झाला होता. त्यावेळी आपला समाज मानसिक तणावाखाली होता‌. परंतु, युती सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर लोकांच्या मनातील गोष्टी होऊ लागल्या. सर्व सण, उत्सवांवरील निर्बंध उठवले गेले. सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेश मुर्तींवर निर्बंध टाकण्याच काम मागच्या सरकारन केलं. हे निर्बंध उठवण्याच काम शिंदे-फडणवीस सरकारनं केलं. खऱ्या अर्थानं आनंद देण्याच काम आमचं सरकार करत आहे. मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमातून हे कार्य केलं जातं आहे‌. समाजातील मानसिक तणाव दुर करण्यासाठी हे सरकार कार्यरत आहेत.
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. सांस्कृतिक मेळावा उभं करण्याच काम प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. सिंधुदुर्ग हा कलावंतांचा जिल्हा आहे. दशावतारासारख्या कला या जिल्ह्यात जपल्या जात आहेत. हीच परंपरा या महोत्सवाच्या माध्यमातून जतन केली जात आहे. आगामी काळातही याच महोत्सवाचा भाग म्हणून राम मंदिर उभारणीचा इतिहास सांगणारे ‘ अयोध्या ‘ हे महानाट्य प्रत्येक पंचक्रोशीत आयोजित केले जावे, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.
दीपक केसरकर म्हणाले, सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात घेतले‌. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणली. आमचं सरकार हे लोकाभिमुख सरकार आहे‌. मराठी भाषा, मराठी संस्कृतीची जपणूक करण्याच काम हे सरकार करत आहे‌‌. हा महोत्सव जिल्ह्याच्या पर्यटनासाठी महत्त्वाचा असून महाराष्ट्रातील उत्कृष्ट शहर म्हणून सावंतवाडीला जगाच्या नकाशावर न्यायचं आहे. पुढच्या काळात सावंतवाडी हे पर्यटनदृष्ट्या आकर्षक शहर असेल. येथील ऐतिहासिक मोती तलावात दुबईच्या धर्तीवर फाऊंटन होईल. येणाऱ्या सहा महिन्यांत जिल्ह्याचा कायापालट झालेला असेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
आमदार राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला महोत्सवांची परंपरा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधु महोत्सवाच्या माध्यमातून अनेक मोठ मोठे कलाकार या जिल्ह्यात आणले. त्याला जनतेने नेहमीच उदंड प्रतिसाद दिला होता. मात्र, अलिकडे काही दिवसांत जिल्ह्यात व कोकणात
‘येड्यांची जत्रा ‘ सुरु होती. या येड्यांच्या जत्रेला प्रतिसाद न मिळाल्याने आमच्याच पंतप्रधानांनी सुरु केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसने ते परत निघून गेले. त्या जत्रेमुळे जिल्ह्यातील बिघडलेले वातावरण या सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवामुळे निवळेल व या महोत्सवाला सिंधुदूर्ग जिल्हावासीय उस्फूर्त प्रतिसाद देतील.