मसुरे,दि.०७ फेब्रूवारी
नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या वडाचापाट येथील आई स्वयंभू शांतादुर्गा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत २५ ते २९ जानेवारी या कालावधीत संपन्न झाला. श्री शांतादुर्गा माऊलीच्या नामाचा जयघोष करीत आई माऊलीचे भरजरी वस्त्रालंकार घालून नटलेले ते भव्य दिव्य, प्रसन्न असे रूप पाहून हजारो भाविक आईच्या चरणी नतमस्तक झाले. भाविकांनी नवस फेडण्यासाठी,ओटी भरण्यासाठी रांगा लावल्याचे दिसून आले.
पाच दिवस विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम,शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांबरोबर सतत पाच दिवस महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. देवीच्या हजारो भक्तांच्या सहकार्याने सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडले. यात्रा कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवसांचा कालावधीत पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ॲडिशनल एस पी ऋषिकेश रावले यांच्यासह
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आई शांतादुर्गा देवीचे दर्शन घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.