प्रदर्शनाचा लाभ जिल्हावाशीयांनी घ्यावा असे आवाहन-मंत्री दीपक केसरकर
सावंतवाडी,दि.०७ फेब्रूवारी
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन २०२३-२४ चे आयोजन दि. १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेले असून या प्रदर्शनाचा लाभ जिल्हावाशीयांनी घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
श्री केसरकर आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी त्यांनी बालवैज्ञानिक प्रदर्शनाबाबत माहिती दिली त्यांच्यासोबत यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख ,माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, भोसले नॉलेज सिटी चे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले’ राष्ट्रीय विज्ञान शिक्षण संस्था नागपूरचे अधिवस्थापना प्रवीण राठोड गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके आधी अधिकारी वर्ग उपस्थित होता.
श्री केसरकर म्हणाले,दरवर्षी राज्यस्तरीय प्रदर्शनाची जबाबदारी महाराष्ट्रातील एका जिल्ह्याकडे दिली जाते. यावर्षी हे प्रदर्शन आयोजित करण्याची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्ह्याने घेतलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली देशातील इयत्ता ६ वी १२ वी (प्राथमिक-माध्यमिक) च्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पकता आणि विज्ञान आणि गणितातील नवनिर्मितीच्या वृत्तीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन हा या उपक्रमांचा एक भाग आहे. ज्यामध्ये देशभरातील सर्व राज्यांमधून राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात निवड झालेल्या विद्यार्थ्यांमधील निवडक विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. राज्यस्तरीय प्रदर्शनाची सुरुवात ही तालुकास्तरापासून होते. तालुकास्तरावरील विजयी विद्यार्थी जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात आणि जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात विजयी झालेले विद्यार्थी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात सहभागी होत असतात.
मुलांना त्यांच्या नैसर्गिक जिज्ञासा आणि सर्जनशीलतेसाठी एक व्यासपीठ प्रदान करणे,मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या घडामोडींमध्ये विज्ञान आणि गणिताची अनुभूती मिळावी आणि त्यांचा उपयोग केंपळ देशाच्या आर्थिक विकासातच नव्हे तर समाजात प्रचलित असलेल्या समस्या सोडवण्यासाठीही करता येईल याची जाणीव करून देणे. स्वावलंबन, सामाजिक-आर्थिक आणि सामाजिक पर्यावरणीय विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञानाच्या विकासाकडे मुख्य साधन म्हणून पाहण्यावर भर देणे.मुलांना राष्ट्राच्या भवितव्याबद्दल दूरदर्शी बनवणे आणि त्यांना संवेदनशील आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रोत्साहित करणे, विविध लोक, संस्कृती, समाज आणि वातावरणामुळे विज्ञान कसे विकसित झाले आहे आणि प्रभावित झाले आहे हे मुलांना समजण्यास मदत करणे, आजच्या वातावरणात निरोगी आणि शाश्वत समाज राखण्यासाठी जागतिक समस्यांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गंभीर विचार विकसित करणे, कृषी, खते, अन्न प्रक्रिया, जैवतंत्रज्ञान, हरित ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, खगोलशास्त्र, वाहतूक, क्रीडा आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विज्ञान आणि गणिताचा उपयोग नवीन उपाय शोधण्यासाठी केला जाऊ शकतो हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे,पर्यावरणीय समस्या आणि आव्हाने याबद्दल जागरूकता पसरवणे आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना तयार करण्यासाठी मुलांना प्रेरित करणे हा यामागचा उद्देश आहे.
मंत्री केसरकर पुढे म्हणाले, या प्रदर्शनात राज्यातील ३५ जिल्हे आणि मुंबईतील दोन उपविभाग अशा एकूण ३७ जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार आहेत यामध्ये २९० बाल वैज्ञानिक आपल्या वैज्ञानिक प्रतिकृतींचे नवनिर्मितीचे प्रदर्शन या प्रदर्शनातून घडवणार आहेत तसेच १०९ शिक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यक हे आपले शैक्षणिक साहित्य या प्रदर्शनात प्रदर्शित करणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा लाभ घेता यावा त्यांनाही नवनिर्मितीची प्रेरणा मिळावी यासाठी सर्व तालुक्यातून दररोज एक हजार विद्यार्थी व शिक्षक या प्रदर्शनास भेट देतील तशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे शिवाय या प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्रातील विविध स्वयंसेवी संस्था विज्ञान संस्था उपक्रम शिक्षक हे स्टॉलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संस्कृती परंपरा आदिवासी कला कस्तुरी विज्ञान व गणिताच्या अध्यापनातील नाविन्यपूर्ण कल्पना नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून गणित व विज्ञान विषयातील पायाभूत संकल्पना चे
स्पष्टीकरण याचे प्रदर्शन घडवणार आहेत हे प्रदर्शन सर्वांत लोकांसाठी खुले राहणार असून सर्व विद्यार्थी शिक्षक पालक विज्ञान प्रेमी आणि मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.