अरुणा धरणाच्या कालव्याचे काम बंद  आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरु

वैभववाडी,दि.७ फेब्रुवारी
अरुणा धरणाच्या कालव्याचे काम बंद  आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरु आहे. धरणग्रस्त प्रकल्पस्थळी ठाण मांडून बसले असून प्राधान्यांने पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार धरणग्रस्तांनी केला आहे.
हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणातील पाणी प्रश्न व अन्य समस्यांकडे वारंवार लक्षवेधूनही पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत सोमवारपासून येथील धरणग्रस्तांनी प्रकल्पस्थळी जाऊन काम बंद पाडले आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी धरणग्रस्त प्रकल्पस्थळी ठाण मांडूण बसले आहेत. कालवे व संबंधित काम पूर्णपणे बंद आहे.
दरम्यान मंगळवारी दुपारी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री.मगरे यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन चर्चा केली. यावेळी धरणग्रस्तांना श्री.मगरे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप धरणग्रस्तांनी केला. यावेळी अधिकारी व धरणग्रस्तांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. माञ  त्यांच्याकडून पाण्या संदर्भात कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही.त्यामुळे धरणग्रस्त काम बंद आंदोलनावर ठाम आहेत.
हेत किंजळीचा माळ येथील पुनर्वसन गावठाणासाठी हेत बांबर येथे विहीर मारण्यात आली होती. या विहीरीवरुन गावठाणाला नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या विहीरीचा ताबा पुनर्वसन गावठाणाला दयावा. अशी मागणी धरणग्रस्तांकडून करण्यात येत आहे. माञ आता ही विहीरच पुनर्वसन गावठाणासाठी नसाल्याचे आता पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. ही विहीर नाही तर आम्हांला दुसरी विहीर मारुन दया. अशी मागणी धरणग्रस्त करीत आहेत. माञ याबाबत संबंधित विभागाकडून ठोस निर्णय घेण्यात येत नाही. त्यातच गेले आठ दिवस या विहीरीवरील नळयोजाना बिघाडामुळे बंद आहे. त्यामुळे धरणग्रस्तांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
त्याचबरोबर पुनर्वसन गावठाणातील अन्य समस्यां कायम आहेत. धरणग्रस्तांच्या सभेत पाटबंधारे विभागाकडून आश्वासन देण्यात येते. माञ त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हांला काम बंद आंदोलन करण्याची वेळ आली आहे. प्रकल्पासाठी आम्ही गाव घर सोडले. त्या धरणग्रस्तांवर त्यांच्या न्याय मागण्यासाठी शासन दरबारी हेलपाटे मारावे लागत आहेत. अशी तीव्र नाराजी धरग्रस्तांकडून व्यक्त केली जात आहे.
गेले तीन दिवस वयोवृध्द पुरुष, महिला धरणग्रस्त आंदोलन स्थळी ठाण मांडून बसले आहेत.

चौकट-
अरुणा मध्यम प्रकल्प धरण प्रकल्प केंद्र सरकारच्या पंतप्रधान सिंचन योजनेत असून धरणाचे व कालव्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे शासनाचे उदिष्ट असल्याचे सांगितले जात आहे. माञ एकीकडे धरणाचे व कालव्याचे काम युध्द पातळीवर करण्यात येत आहेत. माञ या धरणासाठी स्वतःचे गाव, घरदार व सर्वस्वाचा त्याग केला आहे. त्या धरणग्रस्तांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे धरणग्रस्तांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.