नौसेना दिनानिमित्त मालवणात झालेल्या हेलिपॅड व शिवपुतळा सुशोभीकरण कामात मोठा घोटाळा – परशुराम उपरकर

कामांच्या चौकशीसाठी १५ रोजी आंदोलन

मालवण.दि.७ फेब्रुवारी

मालवणात नौसेना दिननिमित्त झालेल्या हेलीपॅड व राजकोट येथील शिवपुतळा सुशोभीकरण कामात मोठा घोटाळा झाला आहे, या कामांची कागदपत्रे व प्रत्यक्ष झालेले काम यात मोठी तफावत आहे, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत केला. या कामांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कणकवली कार्यकारी अभियंता श्री. सर्वगोड यांची सखोल चौकशी व्हावी तसेच सर्वगोड यांच्या पद नियुक्तीनंतर सिंधुदुर्गात झालेल्या अन्य कामांची व रस्त्यांच्या कामांची स्टफवेल सारख्या यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, या मागणीसाठी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर १५ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येणार आहे, या आंदोलनास सार्वजनिक बांधकाम विभागाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग परिमंडळ अधीक्षक अभियंता हे उपस्थित राहून आमच्याशी चर्चा करत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार, असेही परशुराम उपरकर यांनी सांगितले.

मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत परशुराम उपरकर हे बोलत होते. यावेळी विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, संदीप लाड आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, नौसेना दिनानिमित्त मालवणात तयार केलेल्या हेलीपॅडची आम्ही तपासणी करून मोजमाप घेतले. अंदाज पत्रकातील कामाचे स्वरूप आणि प्रत्यक्ष झालेले काम यामध्ये मोठी तफावत दिसून आली. तसेच नौसेना दिनानिमित्त केलेल्या रस्त्यांच्या कामेही नित्कृष्ट असून रस्ते घुशीनी पोखरले आहेत. या कामांमध्ये सव्वा दोन कोटी रुपये खर्च करून जनतेच्या पैशाचा अपव्यय करण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे मनमानी कारभार करत आहेत. पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे जिल्ह्यात असताना कार्यकारी अभियंता मात्र आठवड्यातून तीन चार दिवस मुंबईला असतात. जनतेला भेटायला त्यांना वेळ नाही अशी टीका उपरकर यांनी केली.

कार्यकारी अभियंता सर्वगोड हे केलेल्या कामांची माहिती देण्यासही टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे त्यांनी केलेल्या कामांची चौकशी झाली पाहिजे. कामांची अंदाजपत्रके तपासली पाहिजेत. बोर्डिंग ग्राउंड येथे केलेल्या हॅलिपॅडच्या कामाचे अंदाजपत्रक नाही. आंगणेवाडी येथेही झालेल्या रस्त्यांची कामे विना निविदा करण्यात आली यामुळे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी केलेल्या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे परिमंडळ अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे असेही उपरकर यांनी सांगितले.