राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत वराडकर हायस्कुलचे समीर चांदरकर प्रथम

मालवण,दि.०८ फेब्रुवारी

राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२३- २४ या स्पर्धेत माध्यमिक गटात कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक समीर अशोक चांदरकर यांनी सादर केलेल्या “शाळेला सुट्टी, शिकू नव्या गोष्टी ” या नवोपक्रमास राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या स्पर्धेत राज्यभरातून सहभागी झालेल्या ८११ स्पर्धकांमधून समीर चांदरकर यांची प्रथम क्रमांकासाठी निवड झाली.

समीर चांदरकर यांनी ‘विद्यार्थ्यांनी केल्या शालेय भिंती बोलक्या’, फेस पेंटिंग, माझा बाप्पा माझा मुषक, आषाढी कार्तिकी निमित्त चित्र प्रदर्शन, पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवणे, ७५फूट लांबीचे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे पोस्टर, कट्टा येथील एसटी स्टँड परिसरात सामाजिक संदेश अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये कला विषयाची गोडी निर्माण केली. हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक संजय नाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमास राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळून पुणे येथे समीर चांदरकर यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण (SCRT, PUNE ) उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, सहसंचालक डॉ. शोभा खंदारे, उपसंचालक ज्योती शिंदे, उपसंचालक रमाकांत काटमोरे, SCRT उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांच्या उपस्थितीत झाले.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर व कट्टा गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, सचिव विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळवराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे मुख्याध्यापक संजय नाईक, व सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी चांदरकर यांचे अभिनंदन केले. पुणे येथे समीर चांदरकर यांचा गौरव केल्यानंतर कट्टा येथे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, सचिव विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर, संचालिका सौ. स्वाती वराडकर, मुख्याध्यापक संजय नाईक व शिक्षक यांनी चांदरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर वराडकर हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांसहित लेझीम पथकासह कट्टा बाजारपेठ ते वराडकर हायस्कूल पर्यंत मिरवणूक काढून अभिनंदन करण्यात आले.