महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परशुराम उपरकर यांचा पक्षासोबत यापुढे कोणताही संबंध असणार नाही-मनसेचे नेते शिरीष सावंत

सावंतवाडी, दि.८ फेब्रुवारी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परशुराम उपरकर यांचा पक्षासोबत यापुढे कोणताही संबंध असणार नाही असे मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी म्हटले आहे तर परशुराम उपरकर यांनी आपण सरचिटणीस व प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे असे पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. तेव्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भुमिका मांडली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संघटना पुनर्बाधणी करण्यासाठी जुनी संघटना रद्द केली. यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सुरू केल्या मात्र यात परशुराम उपरकर यांना दूर ठेवले होते. उपरकर हे मुळचे शिवसेनेचे होते. नारायण राणे यांच्या विरोधात कणकवली येथे विधानसभा पोटनिवडणुक लढले होते. दरम्यान उपरकर यांनी राज ठाकरे यांचे नेतृत्वाखाली काम सुरू केले होते.
दरम्यान उपरकर यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, आपण सरचिटणीस पदाचा व प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्याकडे दिला असून आपला राजीनामा स्वीकारावा अशी त्यांनी मागणी केली आहे.

गेले काही दिवस सिंधुदुर्ग मनसेत खदखद आहे. दोन गट निर्माण झाले आहेत. यावरून त्या ठिकाणी काम करणाऱ्या उपरकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या गटात नाराजी होती. ती आता उघडपणे बाहेर पडली आहे. श्री. उपरकर यांनी आपण आपल्या सदस्य पदासह चिटणीस पदाचा राजीनामा देत
असल्याचे पत्रात म्हटले आहे. तर आपण यापुढे फक्त माजी आमदार म्हणून कार्यरत राहू, तसेच जे माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, असे त्यांनी सांगितले.
उपरकर यांच्या पुढील निर्णयाची कार्यकत्यांना प्रतिक्षा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत यांनी उपरकर यांचा पक्षासोबत कोणताही संबंध असणार नाही असे म्हटले तर आपण सरचिटणीस व प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे असे उपरकर यांनी सांगितले आहे.