ओरोस येथे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा उद्या जनता दरबार

सिंधुदुर्गातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडणार – संदेश पारकर

कणकवली दि .८ फेब्रुवारी(भगवान लोके)
महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ९ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ओरोस येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे जनता दरबार घेवून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. अशी माहिती ठाकरे
शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली.
कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत- पालव,शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले ,सचिन सावंत व शिवसैनिक उपस्थित होते.

संदेश पारकर म्हणाले, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी व सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी यांच्या समवेत नागरीकांच्या समस्या व जिल्हयातील विकास कामांबाबत चर्चा करणार आहेत.तर दुपारी ४ वाजता ओरोस येथील पत्रकार भवन येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत .१मे, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या दिवशी जिल्ह्यातील अनेक जण आपल्या प्रश्नांसाठी आंदोलने, उपोषण करतात. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार आहेत. शिक्षण, वीज, पाणी, आरोग्य यासारख्या समस्यांबाबत शासन उदासीन आहे. या समस्या समजून घेऊन ते प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न होणार आहे. आज शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे .त्याचप्रमाणे धरणाची कामे अपूर्ण आहेत. एसटीच्या समस्या आहेत. जलसंधारण त्याप्रमाणे पाणी समस्या कायम आहे. काजू बिला २०० रुपये हमीभाव मिळावा यासाठी सतीश सावंत यांनी प्रयत्न केले होते. त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. मच्छीमारांचे प्रश्न, रस्त्याच्या समस्या या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम अंबादास दानवे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने होणार आहे .तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान,खावटी कर्ज याबाबतही पाठपुरावा जनता दरबारच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे संदेश पारकर म्हणाले.