मालवण,दि.८ फेब्रुवारी
आजच्या विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कुवत ओळखून पुढची वाटचाल ठरवली पाहिजे. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचे काहीतरी निर्माण करण्यासाठी उद्योग क्षेत्राकडे वळावे. कोणताही उद्योग एकदम मोठा होत नाही, उद्योग क्षेत्रातील छोट्या छोट्या संधीचे सोने करून मोठी झेप घ्यावी, असे प्रतिपादन मसुरे कावावाडी येथील युवा उद्योजिका रुचिता नार्वेकर हिने भंडारी हायस्कुल मालवण येथे बोलताना केले.
हॉटेल मॅनेजमेन्ट करून मुंबईत चांगल्या हॉटेल मध्ये असलेली नोकरी सोडून गावी येऊन बेरोजगार मुलांना सोबत घेऊन समारंभातील जेवणाच्या सर्व्हिसचा उद्योग करणारी मसुरे कावावाडीची सुकन्या आणि मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी रुचिता नार्वेकर हिचा भंडारी हायस्कुलतर्फे प्रशालेत सत्कार करण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रुचिता ही बोलत होती. यावेळी व्यासपीठावर भंडारी एक्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, मुख्याध्यापक हणमंत तिवले, प्रशालेतील एम.एस.ए.टी. (आयबीटी) विभागाचे निदेशक केशव भोगले, जगन्नाथ आंगणे, दर्शना मयेकर, नेहा गवंडे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी रुचिता नार्वेकर म्हणाली, आपण ओसरगाव येथील कॉलेज मध्ये हॉटेल मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केल्यावर मुंबईत कामाची संधी मिळाली. मात्र, तेथे काम करताना दुसऱ्यांच्या हाती काम करावे लागत असल्याने आपण स्वतः मालक बनले पाहिजे, आपण काही जणांना काम देणारे बनले पाहिजे असे विचार मनात यायचे. त्यातूनच आपण चांगल्या हॉटेल मधील नोकरी सोडून गावात परत येऊन येथील बेरोजगार तसेच कामाची आवश्यकता असणाऱ्या मुलांना एकत्र करून त्यांना हॉटेल मॅनेजमेन्ट बाबत माहिती व मार्गदर्शन दिले. त्यांना सोबत घेऊन लग्न व इतर समारंभाच्या जेवणाच्या ऑर्डर घेऊन सर्व्हिस देऊ लागलो. हळूहळू कामाचा व्याप वाढत जाऊन आज ४०० जण माझ्या टीम मध्ये कार्यरत आहेत. आजच्या विद्यार्थ्यांनीही नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण करण्याच्या दृष्टीने शिक्षण घ्यावे व तसे ध्येय निश्चित करून वाटचाल करावी, असेही रुचिता नार्वेकर म्हणाली. यावेळी वामन खोत यांनीही विचार मांडत रुचिताच्या यशाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी तिच्यापासून प्रेरणा घ्यावी, असे सांगितले.