शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार

मुंबई,दि.०९ फेब्रूवारी

कल्याणमधील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्थानकात गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी भरदिवसा मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपूत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. मॉरिस नावाच्या एका गुंडाने समोरुन अभिषेक घोसाळकरांवर ५ गोळ्या झाडल्या. यातील ३ गोळ्या अभिषेक यांच्या शरीरात घुसल्या आणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या गोळीबारानंतर मॉरिसने एक गोळी स्वत:च्या डोक्यात झाडली आणि आत्महत्या केली. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना तातडीने करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अधिक माहिती अशी की, अभिषेक घोसाळकर हे मुंबईतील त्यांच्या पक्षाच्या आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला गुरुवारी दुपारी गेले होते. अभिषेक घोसाळकर यांना तेथे एक फोन आला. फोन करणार्‍या व्यक्तीने त्यांना कार्यालयात बोलावून घेतले. मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा फोन केल्याचे कळते. मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांच्यात गेले काही दिवस वाद सुरू होते. फोनवरुन मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना स्वत:च्या कार्यालयात बोलावून घेतले. पैशावरुन वाद झाले आणि त्यानंतर मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर समोरुन पाच गोळ्या झाडल्या.