सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारीत करणे या ५६.१७ कोटी रुपयांच्या कामाचा भूमीपूजन सोहळा १० फेब्रुवारी रोजी

सावंतवाडी,दि.९ फेब्रुवारी
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारीत करणे या ५६.१७ कोटी रुपयांच्या कामाचा भूमीपूजन सोहळा उद्या शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना.श्री. नारायण राणे, केंद्रीय मंत्री, सुक्ष्म, लघु व मध्यम उदयोग, भारत सरकार हे असणार आहेत. सदर कार्यक्रम ना.श्री. रविंद्र चव्हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम वगळून) तथा पालकमंत्री, ना.श्री. दिपक केसरकर मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा, खासदार श्री. विनायक राऊत, आमदार.श्री.निरंजन डावखरे, आमदार श्री. अनिकेत तटकरे, आमदार .प्रा.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार श्री.वैभव नाईक, आमदार.श्री. नितेश राणे, जिल्हाधिकारी श्री.किशोर तावडे, पोलिस अधीक्षक .श्री.सौरभकुमार अग्रवाल या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे.
सदर योजनेसाठी महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग शासन निर्णय क्र. नगरो- दि २५ एप्रिल २०२३ द्वारे ५६.१७ कोटी रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत पाळणेकोंड धरणाची सुधारणा करणे, नवीन जलशुध्दीकरण केंद्र बांधणे, शहरातील झिरंग व गरड भागामध्ये दोन उंच सलोह पाण्याच्या टाक्यांची उभारणी करणे, पाळणेकोंड धरण ते नवीन पाण्याच्या टाकीपर्यंत गुरुत्ववाहिनी टाकणे तसेच शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था सुधारणे इ. कामे करण्यात येणार आहेत.
 सावंतवाडी शहरातील पाणीपुरवठया संबंधी ही एक महत्वाची योजना असून सदर योजनेच्या भूमीपूजन सोहळयात नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याधिकारी  श्री. सागर साळुंखे यानी केले आहे.