उपविभागीय अभियंता विनायक जोशी यांनी दिलेल्या या लेखी आश्वासानानंतर आचिर्णे ग्रामस्थांनी आपलें आंदोलन मागे

वैभववाडी,दि.९ फेब्रुवारी
आचिर्णे- अरुळे हा ग्रामीण मार्ग क्रमांक 120 जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येत आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम 2024 25 च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात येईल. राज्य शासनाकडून त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास व जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून ना हरकत प्राप्त झाल्यास रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विनायक जोशी यांनी दिलेल्या या लेखी आश्वासानानंतर आचिर्णे ग्रामस्थांनी आपलें आंदोलन मागे घेतले आहे.
आचिर्णे – अरुळे रस्ता व्हावा अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आहे. या रस्त्याची लांबी 5 किलोमीटर आहे. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या मार्गाचा सर्व्हे करण्यात आला होता. मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सध्या स्थितीत हा मार्ग म्हणजे केवळ पायवाट आहे. परिणामी येथील नागरिकांना या मार्गांवरून ये जा करणे अवघड होत आहे. येथे धनगर समाजाची वस्ती आहे. येथील रुग्णाला उपचारासाठी आणताना पाळणा करून पायपीट करून आणावे लागत आहे.
हा मार्ग तात्काळ करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आचिर्णे दुर्गाडी येथील ग्रामस्थांनी दिला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी आंदोलनाला सुरुवात केली. दिवसभर सुरु असलेल्या आंदोलनाला शिवसेना उबाठा गटाचे नेते अतुल रावराणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता विनायक जोशी यांच्यासह भेट दिली.
यावेळी जोशी यांनी सदर रस्त्याच्या नूतनीकरणाचे कामं 2024-25 च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात येत आहे राज्य शासनाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर या रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात येईल. असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी आपल्या आंदोलन स्थगित केले आहे.
यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्यासोबत माजी सभापती लक्ष्मण रावराणे,संतोष बोडके, धुळाजी काळे आधी उपस्थित होते.