महसूल कारवाईतून दोन बोटी निसटल्या – आरोंदा-सावरजूवा येथील घटना

 पंधरा परप्रांतीय कामगारांना घेतले ताब्यात

बांदा, दि.१० फेब्रुवारी

सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी शुक्रवारी पहाटे 5 वा. आपल्या पथकासह आरोंदा-सावरजूवा तेरेखोल खाडी किनारी धडक दिली. पथक आल्याचे पाहताच रेती उत्खनन(उपसा) करणाऱ्या दोन बोटी गोव्याच्या दिशेने पळून गेल्या. मात्र, किनाऱ्यावर रेती काढण्यासाठी असलेले 15 परप्रांतीय कामगारांना साहित्यासहित ताब्यात घेतले. सावंतवाडी महसूल प्रशासनाकडे बोट नसल्याने सदर रेती उपसा करणाऱ्या बोटींना पळून जाण्यात यश मिळाले.
आरोंदा-सावरजूवा येथे तेरेखोल खाडी पात्रात रेती उपसा सुरू असल्याची पक्की खबर सावंतवाडी तहसील कार्यालयाला मिळाली. त्यानुसार तहसीलदार श्रीधर पाटील तसेच निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण, मंडळ अधिकारी विनायक कोदे, संजय यादव, पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील, तलाठी एस. जी. सोनसुरकर, सचिन गोरे, प्रवीण पोले, सचिन चितारे, संदीप मुळीक, कोतवाल नरेश जाधव, दिनेश पेडणेकर, पोलिस पाटील महादेव केरकर, पोलिस हवालदार मनोज मारुती राऊत, होमगार्ड शंकर भांडये या पथकाने अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण 15 परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेतले. तसेच खोरी, घमेल, चार बांबू, फळी, दोन बॅटऱ्या आदी साहित्य जप्त करण्यात आले.
————-
चौकट करणे—–
बोटींचे गोव्याच्या दिशेने पलायन
सावंतवाडी महसूल पथक कारवाई करण्यासाठी येत असल्याचे पाहताच सावरजूवा येथे रेती उत्खनन करणाऱ्या दोन बोटींनी गोव्याच्या दिशेने पलायन केले. मात्र परप्रांतीय कामगार सापडले. कारवाई करताना पथकाकडे बोट नसल्याने सदर रेती उपसा करणाऱ्यांना पळून जाण्यात यश मिळाले.
————-
प्रतिक्रिया करणे—-
रेती उत्खनन करणाऱ्या बोटी गोव्याच्या दिशेने पळाल्या तरी त्या सावंतवाडी तालुक्यातील असणार. अशा बेकायदेशीर रेती उत्खननावर (उपशावर) आमची करडी नजर आहे. तसेच प्रशासनाकडून वारंवार कारवाई करण्यात येणार आहे.
– श्रीधर पाटील, तहसीलदार सावंतवाडी