न्हावेलीत गव्यांकडून चवळी, मिरचीचे नुकसान

बांदा,दि.०३ जानेवारी 
न्हावेलीत गव्या रेड्यांकडून नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गव्यांचा कळप मिरची तसेच चवळी, कुळीत शेतीमध्ये उतरून मोठ्या प्रमाणात नासधूस केली. त्यामुळे शेतकरी वर्ग वैतागला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गव्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई वन विभागाने तत्काळ देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गव्यांच्या कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. न्हावेली येथील शेतकरी प्रकाश धाऊसकर व रमेश धाऊसकर यांच्या मिरची, नाचणी, भुईमूग या शेतीत मोठ्या प्रमाणावर गवे रेडे घुसून शेतीची नासधूस केली. एकीकडे महागाई वाढली असताना रासायनिक खतांसोबत कीटकनाशके आदींचा खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड यातून बसत आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करूनही वन विभाग सपशेल अपयशी ठरत आहे. वन विभागाकडून शेतीची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत केली जाते. मात्र ही मदत तुटपुंजी असल्याने खर्च आणि नुकसानी यामध्ये ताळमेळ बसत नाही त्यामुळे शेतकरी हा नेहमीच आर्थिक नुकसानीत जातो हे मोठे दुर्दैव आहे, असे उपसरपंच पार्सेकर यांनी सांगितले.
न्हावेली येथील शेतकऱ्यांच्या मिरची शेतीची गव्यांनी केलेली नुकसानीची उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी पहाणी केली. बांधावरूनच थेट वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन लावून तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली. शिवाय शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.