सावंतवाडी दि.३ फेब्रुवारी
लोकनेते नामदार व श्री भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत यांच्या १०१ जयंतीनिमित्त अर्धाकृती पुतळा अनावरण आणि स्मरणका प्रकाशन सोहळा मंगळवार दि.४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. अर्धाकृती पुतळा अनावरण प्रेरणा समाधी स्थळ माजगाव सावंतवाडी येथे सकाळी ९.३० वाजता होईल.
शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी आणि नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माजी केंद्रीय कायदामंत्री अँड रमाकांत खलप,माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री उदय सामंत ,माजी मंत्री आमदार बंटी पाटील, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, श्रीमंत खेमराज सावंत भोसले, आमदार निलेश राणे, आमदार शेखर निकम, माजी खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकासभाई सावंत, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही बी नाईक , आयुवेर्दिक महाविद्यालयाचे अध्यक्ष अँड दिलीप नार्वेकर, शाळा समितीचे अध्यक्ष अमोल सावंत, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.दिनेश नागवेकर यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
स्वर्गिय भालचंद्र अनंत उर्फ भाईसाहेब सावंत यांचा जन्म माजगाव येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात ४ फेब्रुवारी १९२४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण माजगाव येथे चौथीपर्यंत झाले तर पुढील शिक्षण त्यांनी सावंतवाडी हायस्कूलमध्ये केले. ते १९४२ मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. राजाराम कॉलेज कोल्हापूर या संस्थेतून ते १९४६ मध्ये बीएस्सी शिक्षण पूर्ण केलं तर सावंतवाडी राणी पार्वती गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीत लागले. अध्यापनाची बीएड पदवी त्यांनी १९५२ ला प्राप्त केली. शिक्षण,सहकार, कृषी, फलोत्पादन, आरोग्य याबाबत त्यांनी कृती केली.
अखंड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा असताना त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईचे संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन मुंबईचे संचालक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, रत्नागिरी जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अध्यक्ष, सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी चे अध्यक्ष तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्या पदना त्यांनी योग्य न्याय दिला. आजही भाईंची आठवण काढली जाते.
बीएससी ही पदवी प्राप्त करून राणी पार्वती देवी हायस्कूलमध्ये २० जून १९४० ला त्यांनी शिक्षकाच्या नोकरीला प्रारंभ केला. १९६२ मध्ये कसई दोडामार्ग जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आले. दोन वर्षात अखंड रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही ते विराजमान झाले. सावंतवाडीतील शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेपासून भाईसाहेब सावंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य होते, ६ जून १९७६ ते २६ जून १९८८ या कालावधी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. ग्रामीण मुले शिक्षण वंचित राहू नये म्हणून त्यांनी ठीक ठिकाणी माध्यमिक शाळा काढल्यात आरोग्य मंत्री असताना महाराष्ट्रात वैयक्तिक सुविधा निर्माण करून ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आरोग्य केंद्र, उपकेंद्र रुग्णालय सुरू केले. विकासासाठी विविध सोसायटी, खरेदी विक्री संघ, जिल्हा बँक हे सहकार चळवळीतील जाळे निर्माण केले. रोजगार हमी योजनेतून फलोद्यान द्वारा लोकसेवा करण्यासाठी पुढाकार घेतला.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भाईसाहेब सावंत यांनी शैक्षणिक, सामाजिक अशी बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राला आपली ओळख करून दिली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून नगर विकास, रोजगार हमी, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, राज्यमंत्री महसूल खार जमीन मस्य व्यवसाय अशी महत्त्वाची खाते त्यांनी सांभाळली.
भाईसाहेब सावंत यांनी पालकमंत्री म्हणून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, रायगड, अहमदनगर या जिल्ह्यांचा कारभार सांभाळला तसेच मंत्री म्हणून महसूल( मदत व पुनर्वसनसह), ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता सह मत्स्यव्यवसाय खार जमीन, बंदरे, सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये, रोजगार हमी योजना तसेच विधिमंडळ कामकाज, राज्य उत्पादन शुल्क व दारूबंदी प्रचार कार्य विशेष सहाय्य वरील सर्व खाती तत्कालीन मुख्यमंत्री कै वसंतदादा पाटील, तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील, यांच्या कारकिर्दीत व तत्कालीन मुख्यमंत्री कै .शंकराव चव्हाण यांच्या कारकीर्दीत राज्य उत्पादन शुल्क व दारूबंदी प्रचार कार्य या अतिरिक्त मंत्रालयासह सर्व खाती सलग त्यांनी सांभाळी. विशेषतः आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी अमुलाग्र बदल केल्याच्या खुणा आजही आहेत . आरोग्य केंद्र व उपकेंद्र जाळे निर्माण केली.
भाईसाहेब सावंत यांच्या आठवणी आजही मान्यवर काढतात, त्यांनी विधिमंडळात केलेल्या कामगिरीचा अमूल्य ठेवा आजही जतन केला आहे. तो भाईंच्या या जन्मशताब्दी वर्षा निमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवण्यात आला आहे. भाईंचा जन्म ४ फेब्रुवारी १९२४ तर मृत्यू २६ जून १९८८ मध्ये झाला या ६४ वर्षाच्या काळामध्ये त्यांनी लोक चळवळी बरोबर सहकार , कृषी, शैक्षणिक सेवेत आणि मंत्रीपदी राहून जनसेवा, जनसंपर्क ठेवत त्यांनी दूरदृष्टी ठेवून विधायक कामे केली.
सावंतवाडी चे शिक्षण प्रसारक मंडळाचे आजचे अध्यक्ष विकास सावंत त्यांचा वारसा सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढे नेत आहेत.
राणी पार्वती देवी हायस्कूल सारख्या शैक्षणिक संस्थेतून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत तर आयुवेर्दिक महाविद्यालयाचे रोपटे भाईसाहेब सावंत यांनी लावले त्यामुळे अनेक विद्यार्थी घडले. भाईसाहेब सावंत आयुवेर्दिक महाविद्यालयाच्या रूपाने भाईंचे शैक्षणिक स्मारक उभे राहिले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राणी पार्वती देवी हायस्कूल आणि भाईसाहेब सावंत आयुवेर्दिक महाविद्यालया बरोबरच जन्मगावी माजगाव येथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हायस्कूल निर्माण केले. शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी भाईसाहेब सावंत यांनी लावलेल्या रोपट्यांचे वटवृक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
भाईसाहेब सावंत यांच्या कारकिर्दीत झालेल्या कामांचा लेखाजोखा मोठा आहे. पद मिळाल्यावर त्यांनी कृती, अंमलबजावणी करत पदाला योग्य न्याय मिळवून दिला. भाईंची ही बहुमोल शिदोरी आठवण रुपी ठेवण्यासाठी स्मरणिका प्रकाशन होत आहे. जाहिरात रूपाने स्मरणिकेतून आर्थिक मदत उपलब्ध होईल. त्यातून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचा हेतू असल्याचे विकासभाई सावंत यांनी म्हटले आहे.