देवगड पोलिसांची कामगीरी;मिठमुंबरी येथील घटना अन्य सहा संशितांना यापुर्वी केली होती अटक
देवगड,दि.३ फेब्रुवारी
मयत व्यक्तिचा नावे खोटे, बनावट खरेदीखत तयार करून व कुळांचे हक्क डावलून त्यांचा नावे असलेल्या जमीनीची परस्पर विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी देवगड तालुक्यातील सहा संशयितांविरूध्द देवगड पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणात मयत सत्यविजय राणे यांच्या नावे तोतया इसम म्हणून उभा केलेल्या चंद्रकांत जगन्नाथ नांदोस्कर(58) रा.मुंबई याला देवगड पोलिसांनी पालघर येथून ताब्यात घेतले.त्याला देवगड येथे आणून अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता देवगड न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मयत व्यक्तिचा नावे खोटे, बनावट खरेदीखत तयार करून व कुळांचे हक्क डावलून त्यांच्या नावे असलेल्या जमीनीची परस्पर विक्री करून शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी देवगड तालुक्यातील सहा संशयितांविरूध्द देवगड पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.ही घटना 29 जानेवारी 2010 ते 16 फेब्रुवारी 2016 या कालावधीत घडली होती.देवगड न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खासगी फिर्यादीनंतर देवगड पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले होते.या घटनेचा तपास तीन महिन्यात पुर्ण करून त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश देवगड न्यायालयाने पोलिसांना दिले होते.त्यानुसार देवगड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
मिठमुंबरी येथील सर्व्हे नं.56, हि.नं.1 ही मिळकत सत्यविजय आत्माराम राणे यांच्या मालकीची असून त्यांचे 7 मे 2006 रोजी निधन झाले.असे असताना मंगेश आत्माराम गावकर(55 रा.मिठमुंबरी), नरेंद्र हरी गावकर(53 रा.मिठमुंबरी), संजय सिताराम जाधव(52 रा.इळये), प्रमोद परशुराम गावकर(50 रा.मिठमुंबरी), मोहन सिताराम जाधव(55रा.इळये), बाळकृष्ण आत्माराम गावकर(58 रा.मिठमुंबरी) या संशयितांनी संगनमताने सर्व्हे नं.56, हि.नं.1 या मिळकतीचे 29 नोव्हेंबर 2010 रोजी खोटे, बोगस, बनावट खरेदीखत तयार केले.या मिळकतीच्या सातबारा सदरी मुख्य संशयित मंगेश गावकर यांने आपले नाव लावून घेतले.हे खरेदीखत करताना त्यांनी पुराव्याची खोटी कागदपत्रे जोडली.तसेच मयत सत्यविजय राणे यांच्या नावे कुणीतरी तोतया व बोगस इसम उभा करून खरेदी दस्तावर त्यांचाकरवी सत्यविजय राणे यांच्या खोट्या सह्या, अंगठ्याचे ठसे व फोटो घेेतले गेले तसेच मुख्य संशयित मंगेश गावकर यांने तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरणात एक खोटी, बनावट व बोगस तडजोड पुरशीस दाखल करून त्याआधारे आपण मिळकतीचे मालक कब्जेदार झालो असल्याचा खोटा पुरावा तयार करून तो न्यायालयात सादर केला.याप्रकरणी कुळवहिवाटदार दिलीप कृष्णा नेसवणकर(62 रा.मिठमुंबरी) यांनी देवगड दिवाणी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती.या फिर्यादीवर सुनावणी करताना न्यायालयाकडे दाखल पुरावे ग्राह्य मानून या प्रकरणाचा तपास तीन महिन्यात पुर्ण करून अहवाल न्यायालासमोर सादर करावा असे आदेश देवगड पोलिसांना दिले होते.देवगड पोलिसांनी मुख्य संशयितासह सहा जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.याप्रकरणातील मयत सत्यविजय राणे यांच्या नावे उभा केलेला तोतया इसम शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते मात्र पोलिस निरिक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे बोगस म्हणून उभा केलेला इसम हा मुंबई येथे असल्याची माहिती घेवून त्याला पालघर येथून ताब्यता घेतले.त्या संशयिताचे नाव चंद्रकांत जगन्नाथ नांदोस्कर(58) असे असून यापुर्वीही त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.त्याला सायबर क्राईम ब्रँच व पालघर पोलिसांच्या मदतीने पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव, पो.कॉ.प्रविण त्रिबंके, चालक शिंदे या टीमने ताब्यात घेवून देवगड येथे आणले.त्याला अटक करून देवगड न्यायालायसमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.