कट्टा येथे भंडारी समाजाचा हळदी कुंकू व सत्कार समारंभ संपन्न
मालवण,दि.४ फेब्रुवारी
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री खंबीरपणे उभी असते. राजकीय असो, सामाजिक असो, सरकारी नोकरी असो प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषासोबत उभी आहे. स्त्री ने नेहमी आनंदी रहावे कारण आपल्या घरात आनंदी असलेली स्त्री ही समाजाला देखील आनंदी करू शकते. समाजाबद्दल प्रत्येकाने नेहमी कृतज्ञ असले पाहिजे तरच समाज यशस्वीरित्या पुढे जाऊ शकतो असे प्रतिपादन मालवण येथील समाजसेविका शिल्पा खोत यांनी कट्टा येथे बोलताना केले.
कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ व महिला भंडारी समाज संघ यांच्यावतीने कट्टा येथील ओम गणेश साई मंगल हॉल येथे हळदीकुंकू व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर गीतांजली हिंदळेकर, मामा माडये, ॲड. प्रदीप मिठबावकर, ॲड. श्वेता तेंडुलकर, श्रद्धा नाईक, सरपंच लता खोत, गीता नाईक, सोनल शिरोडकर, मधुरा माडये, श्रद्धा केळुसकर, सपना पावसकर, वैदेही सरमळकर, समृद्धी मसुरकर, गायत्री कांबळी, दर्शना हिंदळेकर, ग्रामपंचायत अधिकारी वेदा हिंदळेकर, कीर्ती मयेकर, प्राप्ती मिठबावकर, वर्षा मिठबावकर, त्रिशा हडकर, प्रांजल नांदोसकर व अन्य महिला उपस्थित होत्या. प्रारंभी प्राप्ती मिठबावकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी सौ शिल्पा खोत म्हणाल्या भंडारी समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून मोठा इतिहास आहे. समाजात वावरताना संघर्ष म्हटले की समोर उभे राहते ती म्हणजे स्त्री संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे स्त्री असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण कोणत्याही अडचणींना खंबीरपणे तोंड देण्यासाठी स्त्री ही नेहमी उभी असते. देव देवतांनी देखील जगाच्या सृष्टीची अनेक सूत्रे देवी मातांच्या म्हणजेच स्त्रीच्या हाती दिलेली आहेत. त्यामुळे स्त्रीला समाजात अनन्य साधारण महत्व आहे. आजचा कार्यक्रम हा जरी हळदीकुंकू समारंभ असला तरीही तो समाज एकत्र करण्यासाठी महत्वाचा दुवा असल्याचे सांगितले
यावेळी कट्टा पंचक्रोशी महिला भंडारी समाज संघ यांच्यावतीने शिल्पा खोत यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. श्वेता तेंडुलकर, श्रद्धा नाईक, सपना पावसकर, ॲड. प्रदीप मिठबावकर, वैदेही सरमळकर, वेदा हिंदळेकर यांनी आपली मनोगते व्यक्त करत महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती मयेकर यांनी आणि आभार त्रिशा हडकर यांनी मानले.