मालवण,दि.०७ फेब्रुवारी
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भव्य व मजबूत असावा, या कामात हलगर्जीपणा होता नये, अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या असल्या तरी नवीन पुतळ्याचे काम जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हे करत असल्याने पुतळा दर्जेदारच होणार याबाबत कोणतेही दुमत नाही. मात्र यापूर्वीचा शिवपुतळा कोसळण्यास जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली च्या कार्यकारी अभियंत्यांवर कोणती कारवाई केलात ? याचे उत्तर पालकमंत्री नितेश राणे यांनी द्यावे, असे ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते श्री. विनोद सांडव यांनी म्हटले आहे.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिना निमित्त उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गतवर्षी ऑगस्ट महिन्यात कोसळला. त्या पुतळ्या उभारणीपासूनच त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण करण्यात येत होते. नित्कृष्ट दर्जाच्या कामामुळेच पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. आता नवीन पुतळा उभारण्यात येत आहे. यापूर्वीच्या पुतळ्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी विभागाशी जोडलेला मालवण तालुका नियमबाह्य पद्धतीने कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाशी जोडण्यात आला होता. मात्र आता नवीन पुतळ्यासाठी मालवण तालुका पुन्हा सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी विभागाला जोडण्यात आला आहे, ही बाब माजी आमदार परशुराम उपरकर यांनी निदर्शनास आणून पुतळा कोसळण्यास सा. बा. विभागाचे कणकवली कार्यकारी अभियंता हेच जबाबदार असल्याचे सांगितले होते. उपरकर यांनी आवाज उठविल्यामुळेच पालकमंत्री नितेश राणे यांना पुतळ्याच्या दर्जेदार कामासाठी सूचना द्याव्या लागल्या, असे विनोद सांडव यांनी म्हटले आहे.
नवीन पुतळ्याचे काम जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हे करत असल्याने ते दर्जेदारच होणार आहे, याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. त्यामुळे केवळ सूचना देण्यापेक्षा यापूर्वीच्या पुतळ्याचे काम ज्यांच्या देखरेखी खाली व नियंत्रणाखाली झाले त्या सा. बा. विभाग कणकवली कार्यकारी अभियंत्यांवर कोणती कारवाई झाली याचे उत्तर पालकमंत्री राणे यांनी द्यावे असेही श्री. सांडव यांनी म्हटले आहे.